इगतपुरीनामा न्यूज, दि. २८ – दि इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंटस ऑफ इंडियाच्या डिसेंबर २०२२ इंटमिजीएट आणि फायनल परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न झाला. अखिल भारतीय पातळीवर ह्या परीक्षेला २० हजार विद्यार्थी बसले. त्यापैकी १ हजार ९५ विद्यार्थी सीएमए अंतिम परीक्षा उत्तीर्ण झाले. यापैकी नाशकातून ६ विद्यार्थी सीएमए यशवंत ठरले. ह्या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयएमआरटी कॉलेजच्या ऑडीटोरियममध्ये संपन्न झाला. यावेळी विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून मराठा विद्या प्रसारक समाज इगतपुरी तालुका संचालक ॲड. संदीप गुळवे आणि नाशिक ग्रामीणचे संचालक रमेश पिंगळे यांची उपस्थिती लाभली. नाशिक चॅप्टरचे अध्यक्ष सीएमए भूषण पागेरे यांच्या हस्ते उपस्थित पाहुण्यांचे सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला. संदीप गुळवे, रमेश पिंगळे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. नाशिक चॅप्टरच्या कार्यक्षेत्रात सीएमएबद्दल व्हिजिबिलिटी देण्यास व भविष्यात या कोर्सबद्दल विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन सत्रे आयोजित करण्यासाठी मविप्र सहकार्य करेल असे आश्वासन त्यांनी दिले. प्रमुख पाहुणे, वक्ते आणि उपस्थित संस्थेचे सदस्य यांच्या हस्ते उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार झाला.
प्रारंभी संस्थेचे अध्यक्ष सीएमए भुषण पागेरे यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांसह पालकांचे अभिनंदन केले. त्यांनी आपल्या भाषणात काही विद्यार्थ्यांनी ही पदवी मिळाल्यानंतर औद्योगिक क्षेत्रात लगेच कशी प्रगती झाली आणि मेहनतीने मिळवळेल्या या शिक्षणाचा कसा फायदा झाला ते सांगितले. यासोबत परीक्षेचा अभ्यास योग्य पध्दतीने कसा करावा आणि सीएमए परीक्षा कशी पास करावी याबद्दल विद्यार्थ्यांना प्रमुख वक्ते सीएमए योगेश पंचाक्षरी यांनी अमुल्य मार्गदर्शन केले. अभ्यासाचे योग्य तंत्र, तसेच वेळेवर होणाऱ्या चुका, त्यावरील सुधारणा यावर योगेश पंचाक्षरी यांनी विद्यार्थ्यांना सल्ला दिला. सीएमए सारख्या कठीण परीक्षेत यशस्वी होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टीबद्दल त्यांनी शेवटी मार्गदर्शन केले. संस्थेतर्फे घेतल्या जाणाऱ्या कोचिंगचे शिक्षक व शिक्षिका पैकी उपस्थित सीएमए मैथिली मालपुरे, सीएमए रेखा सजनानी यांचा देखील सत्कार करण्यात आला. उत्तीर्ण विद्यार्थ्यांनीही मनोगत व्यक्त करतांना संस्थेने वेळोवेळी केलेले मार्गदर्शन आणि कोचिंगसाठी लाभलेल्या शिक्षकाचे आभार व्यक्त केले. संस्थेचे कार्यकारिणी सभासद सीएमए कैलास शिंदे, सीएमए निखील पवार, सीएमए धनंजय जाधव, संस्थेचे इतर सभासद सीएमए देवेंद्र देवरे, सीएमए सुरज लाहोटी, सीएमए जयेश मोरे यांनीही सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्याचे अभिनंदन केले. संस्थेच्या कार्यकारिणी सभासद सीएमए निखील पवार यांनी आभार मानले. डिसेंबर २०२३ च्या परीक्षेसाठी प्रवेश सुरू असून अधिक माहिती साठी नाशिक शाखेशी ०२५३ २५००१५०, २५०९९८९ ह्या क्रमांकावर किंवा व्हॉट्स ॲप ९४२३७३४९००, ईमेल nasik@icmai.in ह्यावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.