
इगतपुरीनामा न्यूज, दि. ८ – घोटी येथील समृद्ध फाऊंडेशनतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा सन्मान उपक्रम घोटीच्या सरस्वती विद्यालयात पार पडला. संस्थेचे अध्यक्ष देविदास पवार, सचिव कोकिळा पवार यांनी ह्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. विविध क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटविणाऱ्या महिला मोठ्या संख्येने हजर होत्या. राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. अध्यक्ष देविदास पवार, सचिव कोकिळा पवार यांच्या हस्ते जेष्ठ शिक्षिका लीलाबाई सोनवणे, घोटी पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रद्धा गंधास, महिला पोलीस उपनिरीक्षक खेताडे, ॲड. धरती राजाराम वाजे, महिला बचत गटाच्या अध्यक्षा माधुरी भगत, आशा वर्कर स्वाती नवगिरे, कामिनी शिंदे, ग्रामीण रुग्णालयाच्या आरोग्यसेविका, बँक कर्मचारी भारती शिंदे, पोस्ट कर्मचारी स्वाती कोकरे यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित महिलांनी आपले मनोगत व्यक्त केले. सरस्वती विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी महिलांसाठी प्रेरणादायक भाषणे, गीत, नृत्य सादर केले. महिलांची संगीत खुर्ची आदी खेळ घेवून प्रत्येकीला भेटवस्तू देण्यात आल्या. कार्यक्रमासाठी सरस्वती विद्यालयाच्या सर्व कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.




