वाकी येथील डहाळे वस्ती पिण्याच्या पाण्यापासून वंचित : ग्रामस्थांकडून विविध अधिकाऱ्यांना पाणी योजनेसाठी साकडे

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील वाकी येथील डहाळेवस्ती येथे पिण्याच्या पाण्याची सुविधा नसल्यामुळे महिलांना एक दीड किलोमीटर अंतरावरून पाणी आणावे लागते. पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी सोय करावे असे निवेदन ग्रामस्थ किरण डहाळे व डहाळे वस्तीच्या वतीने गटविकास अधिकारी, तहसीलदार, ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग व वाकी ग्रुप ग्रामपंचायतीला देण्यात आले. ग्रामसेविका ज्योती केदारे यांनी निवेदन स्वीकारले. आदिवासी बांधवांची येथे ७० ते ८० लोकवस्ती असून ग्रामपंचायतीने वतीने अंदाजे कोटी रुपयांचा योजना राबविल्या आहेत. मात्र आजपर्यंत डहाळे वस्तीपर्यंत पाणी पुरवठ्याच्या योजना आलेल्या नाहीत. यामुळे  महिला डोक्यावर हंडे घेऊन दुरवरून पाणी आणतात. प्रधानमंत्री जलजीवन योजनेअंतर्गत सध्या काम सुरू आहे. मात्र ही वस्ती सदर योजनेपासून वंचित आहे. हर घर जलजीवन योजना मिळाल्यास पिण्याच्या पाण्याची समस्या दूर होईल. आमदार हिरामण खोसकर यांच्या निधीतून या वस्तीत सिमेंट काँक्रीट रस्ता नुकताच मंजूर केल्याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले. जसा रस्ता दिला तशी आमची पाण्याची सुविधा देण्याची मागणी डहाळेवस्तीच्या ग्रामस्थांनी केली.

Similar Posts

error: Content is protected !!