इगतपुरीनामा न्यूज, दि. २०
ज्या गावातील शाळेच्या विद्यार्थ्यांचे पालक जागृत, उत्साही असेल तर त्या शाळेची अन गावाची प्रगती कोणीच रोखू शकत नाही. यासाठी पालक, शिक्षक आणि विद्यार्थी अशी त्रिसूत्री उपयुक्त ठरते. त्यानुसार महाराष्ट्र शासनाने सत्र 2022-23 च्या शैक्षणिक वर्षात इयत्ता 1 ली मध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शाळा पूर्व तयारी मेळावा संपन्न झाला. इगतपुरी तालुक्यातील हा पहिला मेळावा धामडकीवाडी येथील अतिदुर्गम शाळेत उत्साहात पार पडला. मुख्याध्यापक तथा आदर्श शिक्षक प्रमोद परदेशी यांच्या कुशल नियोजनानुसार ह्या कार्यक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद लाभला.
शाळा पूर्वतयारी ह्या अभियानाचा पहिला मेळावा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धामडकीवाडी येथे आगळ्या वेगळ्या पद्धतीने राबवला गेला. शाळेतुन गावकरी, पालक व विद्यार्थी ह्यांची ढोल ताशाच्या गजरात प्रभात फेरी काढण्यात आली. ही प्रभात फेरी ज्या घरी येत्या शैक्षणिक वर्षात शाळेत नवीन दाखलपात्र विद्यार्थी आहे अशा ठिकाणी काढण्यात आली. प्रभातफेरी घरी पोहचताच गावातील मान्यवर व्यक्ती, समिती सदस्य, मुख्याध्यापक तथा राज्य आदर्श शिक्षक प्रमोद परदेशी व शिक्षक दत्तू निसरड ह्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या डोक्यात टोपी घालून शाळेत प्रवेशित झाल्याबद्दल प्रमाणपत्र तसेच शाळेत येताना लागणारे लेखन साहित्य देण्यात आले. याप्रकारे सर्व विद्यार्थ्यांना घेऊन प्रभातफेरी शाळेत पोहचली. नवीन विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळेत रांगोळी काढण्यात आली होती. शाळेतील स्टॉलचे उदघाटन शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गोकुळ आगिवले व ग्रामपंचायत सदस्य चांगुणा आगिवले यांच्या हस्ते झाले.
नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे औक्षण करण्यात आले.भविष्यात हे विद्यार्थी मोठे होतील तेव्हा त्यांना शाळेतील पहिले पाऊल आठवणीत राहील. ह्यानंतर शाळेतील लावलेल्या विविध स्टॉलवर विद्यार्थ्यांचे भाषा विकास, सामाजिक विकास, गणन पूर्वतयारी तपासण्यात आली. सर्व स्टॉलवर गावातील अंगणवाडी सेविका, मदतनीस स्वयंसेवक म्हणून उत्साहात आपली जबाबदारी पार पाडत होते.पेहेचान प्रगती फाऊंडेशनच्या प्रगती अजमेरा यांच्याकडून विद्यार्थी व ग्रामस्थांना खाऊ व मिठाई वाटप करण्यात आले.वाडीतील जबाबदार लोकप्रतिनिधी, जागरूक नागरिक, उत्साही तरुण व कल्पक शिक्षक यांच्या साहाय्याने शाळा पूर्वतयारी मेळावा उत्साहात पार पडला.