दारणेत बुडालेल्या दोन्ही सख्ख्या भावांचे मृतदेह सापडले : धरणांच्या तालुक्यात बचाव कार्यासाठी योग्य व्यवस्था करण्याची मागणी

इगतपुरीनामा न्यूज, दि. १५ – मासेमारी करण्यासाठी दारणा नदीत बुडत असलेला भाऊ पाहून दुसऱ्या भावाने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र काठावर येत असतांना दोघेही भाऊ पाण्यात बुडाल्याची घटना तीन दिवसापूर्वी देवळे गावाजवळ घडली होती. दोघाही युवकांना शोधण्यासाठी यंत्रणा कामाला लागली होती मात्र त्यात यश येऊ शकले नाही. अखेर आज सकाळच्या सुमाराला दोन्ही सख्ख्या भावांचे मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचे उघडकीस आले. स्थानिक नागरिकांनी घोटी पोलिसांना कळवल्यानंतर युवकांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घोटी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. पंकज काशिनाथ पिंगळे, कृष्णा काशिनाथ पिंगळे रा. आवळखेड असे दुर्दैवी भावांची नावे आहेत. शोधकार्यासाठी इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे, घोटीचे पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर, महिंद्राचे सुरक्षा अधिकारी हरीश चौबे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने आटोकाट प्रयत्न केले होते. दरम्यान धरणांचा तालुका असूनही बचाव कार्यासाठी आवश्यक साहित्य, व्यवस्था आणि प्रशिक्षित पथक उपलब्ध नाही. याबाबत इगतपुरी तालुक्यातील आदिवासी संघटना यासंदर्भात निवेदनाद्वारे आग्रही मागणी करणार असल्याचे समजते.

Similar Posts

error: Content is protected !!