
प्रभाकर आवारी : इगतपुरीनामा न्यूज, दि. ६ – नाशिक मनपा क्षेत्रात सुरू असलेली सिटीलिंक बससेवा पाडळी फाट्यापर्यंत सुरू करावी असे निवेदन पाडळी, मुकणे, शेनवड, जानोरी आदी गावाच्या सरपंचांनी नाशिकचे नगरसेवक दिनकर पाटील, अधीक्षक अभियंता शिवाजी चव्हाणके यांना दिले. सिटीलिंक बससेवा पाडळी फाट्यापर्यंत सुरू केल्यास गोंदे औद्योगिक वसाहतीमधील कामगार, नाशिकला जाणारे शालेय विद्यार्थी आणि पंचक्रोशीतील प्रवाशांना याचा मोठा फायदा होईल. याचा विचार करून ही बससेवा पाडळी फाट्यापर्यंत सुरू करावी ही मागणी आहे. यासाठी पाडळी देशमुखचे सरपंच खंडेराव धांडे, उपसरपंच बाळासाहेब आमले, माजी सरपंच जयराम धांडे, मुकणेचे सरपंच हिरामण राव आदींच्या शिष्टमंडळाने नगरसेवक दिनकर पाटील यांची भेट घेतली त्यांनी शिष्टमंडळाला अधीक्षक अभियंता शिवाजीराव चव्हाणके यांच्यासमवेत घेऊन जात याविषयाबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी ही बससेवा लवकरच पाडळी फाट्यापर्यंत सुरू करण्याचे आश्वासन दिल्याने पंचक्रोशीतील प्रवाशी, कामगार, विद्यार्थी यांची मोठी गैरसोय दूर होणार आहे.