देशाच्या भवितव्यासाठी गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रेरणास्रोत ठरतील – आमदार सत्यजित तांबे : महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटना नाशिक जिल्हा आयोजित गुणवंत शिक्षक पुरस्कार सोहळा उत्साहात

इगतपुरीनामा न्यूज – छत्रपती शिवराय ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदी महापुरुषांचे विचार क्रांतीदायक आहेत. समाजाच्या विकासासाठी ह्या महापुरुषांनी केलेल्या कार्याचा विस्तार करून शिक्षकांनी सुजाण आणि सजग पिढीचे निर्माण करावे. यामध्ये सुजलाम सुफलाम होणाऱ्या भारत देशाचे भविष्य लपलेले आहे. हे भवितव्य घडवण्यासाठी गुणवंत शिक्षकांना दिले जाणारे जिल्हास्तरीय पुरस्कार प्रेरणास्रोत ठरतील. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने गुणवंतांना सन्मानित करतांना अभिमान वाटतो असे प्रतिपादन आमदार सत्यजितदादा तांबे यांनी नाशिक येथे केले. महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेच्या नाशिक जिल्हा शाखेतर्फे जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. शिक्षकांच्या माध्यमातून पुढच्या पिढीसाठी सुरु असलेली शैक्षणिक उन्नती सर्वांची दशा आणि दिशा बदलून टाकणारी आहे. ह्या लोकोपयोगी कार्याचा दरवळ अखंडित सुरु राहण्यासाठी गुणवंत शिक्षकांचा सन्मान मैलाचा दगड ठरेल असेही ते म्हणाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष शामराव जवंजाळ होते. राज्य सरचिटणीस कैलास बोढारे, राज्य कोषाध्यक्ष अनिल बागुल, जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ सपकाळे, जिल्हा सरचिटणीस सुनील मोरे, जिल्हा कार्याध्यक्ष सुधाकर अहिरे, कोषाध्यक्ष कुंदन दाणी उपस्थित होते. 

आज नाशिकच्या रावसाहेब थोरात सभागृहात झालेल्या कार्यक्रमात डॉ. सागर मंडलिक यांचे “बदलती जीवनशैली आणि आरोग्य” या विषयांवर व्याख्यानही झाले. पत्रकार दिनानिमित्त आदर्श पत्रकार पुरस्काराने इगतपुरीनामाचे संपादक भास्कर बबन सोनवणे यांचा गौरव करण्यात आला. विनोद संपत सूर्यवंशी यांना विशेष समाजसेवक पुरस्कार प्रदान करण्यात आला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते उषा सिताराम सैंदाणे, शोभा चंदर गावित, मनिषा सुभाष सैंद्रे, भीमराव विक्रम मगरे, तुकाराम नामदेव सारुक्ते, किरण रमेश शिवलेकर, सारनाथ जगन्नाथ साळवे, संजय साहेबराव घडसिंग, संतोष भागाजी दोंदे, यादवराव पुंडलिक जाधव, संतोष मुरलीधर डगळे, किरण विनायक ब्राह्मणकर, संजय काशिनाथ बेडसे, दिपक पोपट बागुल, भुषण भगवान निंबाळकर, विलास गंगाधर पानपाटील, फकिरा परशुराम सोनवणे, उत्तम राजाराम चौधरी, संयुक्ता हेमंत कुलकर्णी ह्या गुणवंत शिक्षकांना त्यांच्या आदर्श कार्याबद्दल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. व्यासपीठावर महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद विभागप्रमुख योगेश सोनवणे, मनपा प्रशासन अधिकारी बी. टी. पाटील, नांदगावचे गटशिक्षणाधिकारी प्रमोद चिंचोले, माजी नगरसेवक प्रशांत दिवे, अशोक पवार, संघटनेचे विभागीय अध्यक्ष बी. जे. सोनवणे, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष वाल्मिक कापडणे, जुनी पेन्शन संघटनेचे जिल्हाध्यक्ष वैभव गगे, प्रकाशक विलास पोतदार, इगतपुरीचे विस्ताराधिकारी किशोर सोनवणे, भारत बुकाणे उपस्थित होते. सर्व तालुकाध्यक्ष, सरचिटणीस व कार्यकारिणी सदस्य आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

Similar Posts

error: Content is protected !!