
इगतपुरीनामा न्यूज – “ऑरेंज द वर्ल्ड” हे महिलांवरील व मुलींवरील अत्याचाराविरुद्धचे जागतिक अभियान आहे. ते संयुक्त राष्ट्रसंघाच्या “16 Days of Activism Against Gender-Based Violence” या मोहिमेचा एक महत्त्वाचा भाग आहे. दरवर्षी २५ नोव्हेंबर ते १० डिसेंबर दरम्यान आयोजित होणाऱ्या या उपक्रमाचा उद्देश महिलांवरील व बालिकांवरील हिंसाचार संपविण्यासाठी जागृती निर्माण करणे, सक्षम वातावरण तयार करणे आणि समाजाला प्रत्यक्ष कृतीतून सहभागी करून घेणे हा आहे. या अभियानाचा एक महत्त्वपूर्ण उपक्रम इनर व्हील क्लब ऑफ बॉम्बे नॉर्थ यांनी राबविला. क्लबच्या अध्यक्ष चाहना गांधी, सदस्या प्रगती अजमेरा, झोन १ प्रकल्प सह-समन्वयक शिवानी काजरिया, जिल्हा ३१४ अध्यक्षा लक्ष्मी सिंह, प्रकल्प अध्यक्षा डॉ. संध्या भट यांच्या पुढाकाराने इगतपुरी तालुक्यातील आवळखेड जिल्हा परिषद शाळेतील मुलींना स्वसंरक्षण प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणासाठी गावातील मुली, महिला आणि ग्रामस्थ असे १२५ जण उपस्थित होते. इगतपुरीचे प्रसिद्ध कराटे मास्टर विशाल जगताप आणि त्यांच्या तायकांदो टीमने मुलींना अनपेक्षित परिस्थितीत स्वतःचे रक्षण कसे करावे, हल्लेखोरापासून बचावाच्या प्रभावी तंत्रांचा वापर कसा करावा, आत्मविश्वासाने त्वरित प्रतिकार कसा करावा याचे थेट प्रात्यक्षिक करून दाखवले. मुलींच्या सुरक्षेसाठी स्वसंरक्षणाचे कौशल्य किती आवश्यक आहे याची जाणीव याप्रसंगी सर्वाना झाली. मुख्याध्यापक मधुकर रोंगटे, शिक्षक मारुती कुंदे, प्रकाश ठाकरे, वैशाली चौरे यांनी उपक्रमाचे कौतुक करून अशा प्रशिक्षणामुळे मुलींचा आत्मविश्वास, धैर्य आणि आत्मसन्मान अधिक बळकट होणार असल्याचे सांगितले. हा उपक्रम समाजातील मुलींच्या संरक्षणासाठी व सशक्तीकरणासाठी उठलेले एक प्रभावी पाऊल ठरला.
