रस्ता चोरीला गेल्याची महिला सरपंचाची झेडपीकडे तक्रार ; इगतपुरी तालुक्यातील घटना

इगतपुरीनामा न्यूज, दि. ३ – इगतपुरी तालुक्यातील कुऱ्हेगाव येथील रस्ता चोरी झाला असल्याची तक्रार सरपंच संगीता भाऊसाहेब धोंगडे यांनी नाशिक जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे केली आहे. याबाबत तक्रारीची प्रत ग्रामविकास मंत्री, जिल्हाधिकारी, वाडीवऱ्हे पोलीस ठाणे यांना पाठवण्यात आलेली आहे. हा चोरी झालेला रस्ता शोधून न दिल्यास उपोषण करणार असल्याचे सरपंच सौ. संगीता धोंगडे यांनी सांगितले. शासकीय निधीतून होणारा खर्च जनतेसाठी खर्च व्हावा, कोणाच्याही खिशात हा निधी जाऊ देणार नाही. ह्या प्रकरणी सखोल चौकशी करून कठोर कारवाई करावी, संबंधित व्यक्तींकडून वसुली व्हावी, रस्ता शोधून द्यावा अशी मागणी शिवसेनेचे भाऊसाहेब धोंगडे यांनी केली आहे.

दिलेल्या तक्रारीमध्ये नमूद केले आहे की कुऱ्हेगाव येथे इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांनी गावकऱ्यांच्या मागणीला प्रतिसाद देऊन काशाबाई मंदिर ते हनुमान मंदिर हा १० लाखाचा रस्ता हे कॉंक्रिटीकरण काम मंजूर केले. त्यानुसार जिल्हा परिषदेकडून अंदाजपत्रक, तांत्रिक मान्यता, कार्यारंभ आदेश सुद्धा देण्यात आला. मात्र गेल्या सहा महिन्यांपासून ह्या कामाची गावकऱ्यांनी वाट पाहिली. त्यानंतर संबंधित विभागाकडे चौकशी केली असता रस्ता गावातून गायब झाला असे निदर्शनास आले. त्यामुळे सरपंच संगीता भाऊसाहेब धोंगडे यांनी संबंधित विभागाकडे तक्रार केली आहे. म्हणून कुऱ्हेगाव येथे खमंग चर्चा रंगली असून हा रस्ता नेमका गेला कुठे याची चर्चा सुरु आहे. हा रस्ता शोधून द्यावा अशी मागणी सरपंच सौ. धोंगडे यांनी केली आहे.

Similar Posts

error: Content is protected !!