
इगतपुरीनामा न्यूज, दि. १९ – युवती आणि महिलांसाठी अनेक प्रकारच्या विविध संधी वाट पाहत आहेत. जिद्ध, महत्वाकांक्षा आणि गगनभरारी घेण्याची उर्मी आत्मनिर्भर करण्यासाठी उपयुक्त ठरेल. सगळ्या संधीचे सोने करून महिलांनी उद्योजिका होण्याचे मोठे स्वप्न पाहून त्याच्या पूर्णत्वासाठी झोकून द्यावे. येणारा काळ तुमच्या यशस्वी कारकिर्दीसाठी यशकारक ठरणार असे प्रतिपादन उद्योयिका नेहा खरे यांनी केले. गोखले एज्युकेशन सोसायटीच्या एसएमआरके महिला महाविद्यालयात ‘सृजन’ ह्या शैक्षणिक प्रदर्शनाच्या उदघाटन समारंभात त्या बोलत होत्या. ह्यावर्षी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाची थीम घेवून महाविद्यालयात विविध शाखेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनींनी अभ्यासक्रम आधारित प्रोजेक्ट, मॉडेल तयार केले आहेत. सौ. नेहा खरे पुढे म्हणाल्या की, स्त्रियांमधील उर्जा निश्चितच कौटुंबिक, सामजिक प्रगतीसाठी सहाय्यक ठरते. ‘सृजन’ प्रदर्शन निश्चितच अशा भावी उद्योजिका घडविण्यासाठी सहाय्यक ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ह्याप्रसंगी व्यासपीठावर निवृत्त अध्यापिका सुरेखा जोगी, राजेंद्र जोगी, संस्थेच्या एचआर डायरेक्टर व प्राचार्या डॉ. दीप्ती देशपांडे, उपप्राचार्या कविता पाटील, उपप्राचार्या नीलम बोकील, विद्यार्थिनी सभेचे प्रमुख प्रा. डॉ. विवेक खरे, सृजन प्रदर्शन प्रमुख मैथिली लाखे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मैथिली लाखे केले. त्यांनी मान्यवरांचे स्वागत केले. सुरेखा जोगी ह्यांनी आपल्या मनोगतात महाविद्यालयातील आठवणींना उजाळा दिला. महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. कविता पाटील ह्यांनी सृजन प्रदर्शनाची पार्श्वभूमी स्पष्ट करून महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेतला. प्राचार्या डॉ. दीप्ती देशपांडे ह्यांनी सृजन प्रदर्शनाबद्दल समाधान व्यक्त करून सृजन प्रदर्शनाचे मुख्य उद्देश्य स्पष्ट केले. प्रदर्शनाला नाशिकमधील अनेक शाळा, महाविद्यालये आवर्जून भेट आहेत. १८ ते २० जानेवारी पर्यंत हे प्रदर्शन सर्व नाशिककरांसाठी खुले आहे. सृजनच्या उपप्रमुख डॉ. सविता बोरसे ह्यांनी आभार मानले. रसिका सप्रे ह्यांनी सूत्रसंचालन केले.