इंधनाच्या वाचलेल्या प्रत्येक थेंबामधून बचतीचा महासागर निर्माण होईल – पत्रकार भास्कर सोनवणे : परिवहन महामंडळाच्या इगतपुरी आगारातर्फे इंधन बचत मासिक कार्यक्रमाचा शुभारंभ

इगतपुरीनामा न्यूज, दि. १६ – इगतपुरी तालुक्यासह राज्याच्या सामान्य जनतेच्या हृदयात स्थान असणाऱ्या लालपरीचे योगदान अमूल्य आहे. लालपरीच्या चालकांनी निश्चय करून देशाच्या आत्मनिर्भरतेसाठी इंधनाची बचत करण्याचा संकल्प करावा. प्रत्येकाने वाचवलेल्या इंधनाच्या एका एका थेंबामधून बचतीचा महासागर वाहू शकतो. एसटी कर्मचाऱ्यांची लक्ष्मी असणारी एसटी वाचवण्यासाठी आणि देशाला संपन्न करण्यासाठी सर्वांनी हातभार लावून इंधन बचत करावी असे आवाहन इगतपुरीनामाचे संपादक भास्कर सोनवणे यांनी केले. राज्य परिवहन महामंडळाच्या इगतपुरी आगारातर्फे इंधन बचत मासिक कार्यक्रमाच्या शुभारंभ कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, एसटी कर्मचारी वंदनीय असून सामान्य माणसाला सुखरूप उद्धीष्ट साध्य करण्यासाठी त्यांचे योगदान मोठे आहे. इंधन बचत हा कार्यक्रम वार्षिक सोहळा नसून दैनिक सोहळा असल्याचे ते शेवटी म्हणाले.

टिटोलीचे सरपंच अनिल भोपे म्हणाले की, इंधन बचत मोहीम १६ जानेवारी ते १५ फेब्रुवारी काळात राबवली जात आहे. सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी इंधन बचतीला प्राधान्य देणे आवश्यक आहे. एसटीच्या महसूलातील इंधनावर खर्च होणारा महसूल वाचवला तरच कर्मचारी वाचतील असे ते शेवटी म्हणाले. इंधन बचतीभर देण्यासाठी चालकांना प्रबोधन केले जात आहे. इंधन बचत करण्यासाठी इगतपुरी आगारात वरिष्ठ अधिकारी, ऑइल कंपन्यांचे प्रतिनिधी यांचे मार्गदर्शन सुद्धा देण्याचे नियोजन आहे. या काळात बसेसची तपासणी करुन बस खराब असल्यास दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्या आहेत. याव्यतिरिक्त आगारात इंधन बचतीचे विविध उपक्रम सुरु असतील अशी माहिती इगतपुरीचे आगार व्यवस्थापक संदीप पाटील यांनी यावेळी दिली. सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक वृषाली सोनवणे यांनीही कर्मचाऱ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले. यावेळी कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाप्रसंगी पत्रकार वाल्मिक गवांदे, लघुपट दिग्दर्शक धनराज म्हसणे, खादी ग्रामोद्योग संचालक भगीरथ भगत, वाहतूक निरीक्षक कैलास नाठे, उदय सानप, सहाय्यक वाहतूक निरीक्षक कैलास गरूड यांच्यासह मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते.

Similar Posts

error: Content is protected !!