पाडळी देशमुखला हरिनामाचा गजर, लेझीम पथक व अश्वांसह गोल रिंगण सोहळ्याने दिंडीचे स्वागत : गावकऱ्यांनी स्वयंशिस्तीने दाखवले एकीचे दर्शन

प्रभाकर आवारी : इगतपुरीनामा न्यूज, दि. १६ – इगतपुरी येथील जोग महाराज भजनी मठाच्या इगतपुरी ते त्र्यंबकेश्वर पायीदिंडीचे पाडळी देशमुख येथे लेझीम पथकासह भव्य गोल रिंगण सोहळ्यासह विविध धार्मिक कार्यक्रमांनी स्वागत करण्यात आले. त्र्यंबकेश्वर येथे संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या महावारी निमित्ताने इगतपुरी येथील जोग महाराज भजनी मठातुन मठाधिपती गुरुवर्य माधव महाराज घुले यांच्या मार्गदर्शनाने दरवर्षी इगतपुरी ते त्र्यंबकेश्वर पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. या वारी दरम्यान पाडळी देशमुख येथे दिंडीचा एक रात्र मुक्काम असतो. यंदाही ग्रामस्थांच्यावतीने दिंडी सोहळ्याचे मोठ्या जल्लोषात स्वागत करून भव्य धार्मिक कार्यक्रमांसह दिंडीतील भाविकांसाठी रात्रीच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली.

गावातील तरुणांनी स्वतः स्वयंसेवकाची भूमिका बजावत दिंडीतील भाविकांची व्यवस्था करण्यात हातभार लावला. संपुर्ण ग्रामस्थांनी यात सहभागी होऊन एकीचे दर्शन घडवले. हरिनामाच्या गजरात दिंडी सोहळ्याचे पाडळी देशमुख ग्रामस्थांनी मोठ्या जल्लोषात स्वागत केले. यावेळी पंढरपुर येथे होणाऱ्या रिंगण सोहळ्याप्रमाणेच अश्व, लेझीम पथक, टाळ-मृदुंग व डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन सहभागी झालेल्या वारकऱ्यांचा गावाच्या बाहेर रिंगण सोहळा पार पडला. हा रिंगण सोहळा संपूर्ण दिंडीचे आकर्षण ठरला. या सोहळ्यासाठी पंचक्रोशीतील वारकरी, नागरिक व पाडळी देशमुखचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Similar Posts

error: Content is protected !!