घोटी पोलिसांकडून गावठी दारूचा अड्डा उध्वस्त : दारू बनवण्यासाठी लागणारे ७५ हजाराचे रसायन जागेवरच केले नष्ट

वाल्मीक गवांदे : इगतपुरीनामा न्यूज, दि. १५

इगतपुरी तालुक्यातील घोटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खैरगाव बिटातील शिदवाडी शेजारील मोराच्या डोंगरावर जंगलामध्ये मोठ्या प्रमाणात अवैधरित्या गावठी दारू बनवण्याचे काम सुरु होते. याबाबतची माहिती घोटी पोलीसांना समजताच पोलीस अधिक्षक सचिन पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक माधुरी कांगणे यांच्या मार्गदर्शनाखाली घोटी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांनी पोलीस पथकासह या ठिकाणी धाव घेत या जंगलात दोन ठिकाणी छापा टाकुन गावठी दारूसाठी लागणारे रसायन जागेवरच नष्ट केले.

पोलिसांची चाहुल लागताच दारू बनवणाऱ्या इसमांनी थेट जंगलात पळ काढला. दारू बनवणाऱ्या अज्ञात आरोपींचा पोलीस शोध घेत असुन या कारवाईत पहिल्या छाप्यात गावठी दारू तयार करण्यासाठी लागणारे ४० हजार रूपयाचे ८०० लिटर रसायन व २३०० रुपयाचे साहित्य असा एकुण ४२३०० रुपये किमतीचा मुद्देमाल जागेवरच नष्ट केला. तर याच परिसरात दुसऱ्या ठिकाणी छापा मारत ३० हजार रुपये किमतीचे रसायन व २१०० रुपये किमतीचे असा ३२१०० रुपयाचा मुद्देमाल जागेवरच नष्ट करत मोठी कारवाई केली. या धडक कारवाईत जवळपास ७५ हजाराचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. या कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर, पोलीस हवालदार शितल गायकवाड, प्रकाश कासार, संदीप मथुरे आदींनी सहभाग घेतला असुन अज्ञात आरोपींविरोधात घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!