
इगतपुरीनामा न्यूज, दि. १२ – वर्षाच्या पहिल्याच दिवशी इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथील जिंदाल पॉलीफिल्म्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत आगीची मोठी घटना घडली आहे. यामुळे अनेकांचा बळी जाऊन मोठी हानी झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे. ह्या पार्श्वभूमीवर नाशिकचे जिल्हाधिकारी डी. गंगाथरण यांच्याकडील क्रं. कक्ष१/पीओएल/१/१२७/२३ नाशिक, दि. १० जानेवारी २०२३अन्वये ह्या अपघाताची उच्चस्तरीय चौकशी समिती अप्पर जिल्हाधिकारी नाशिक यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त केलेली आहे. ही समिती शुक्रवारी १३ जानेवारीला सकाळी ११.०० ते दुपारी १ वाजेपर्यंत मुंढेगाव येथील जिंदाल पॉलीफिल्मस प्रायव्हेट लिमिटेड मधील विश्रामगृहात हजर राहणार आहे. यावेळी समितीच्या वतीने ह्या अपघाताबाबत नागरिकांचे म्हणणे ऐकले जाणार आहे. सदस्य सचिव उच्चस्तरीय चौकशी समिती तथा नाशिक विभाग औद्योगिक सुरक्षा व आरोग्य सहसंचालक अंजली छ. आडे यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यानुसार इगतपुरी तालुक्यातील नागरिकांना सूचित करण्यात येते की, मुंढेगाव येथील जिंदाल पॉलीफिल्मस प्रायव्हेट लिमिटेड फिल्मस कंपनीतील अपघाताबाबत जर कोणाचे काही म्हणणे असल्यास नागरिकांनी हजर राहून लेखी स्वरुपात म्हणणे सादर करावे असे आवाहन इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी केले आहे.