काय सांगता ? – जिंदाल जळीतकांडात नेमके किती बळी गेले असावेत ? : इगतपुरी तालुक्याला सतावतोय यक्षप्रश्न

लेखन : भास्कर सोनवणे, मुख्य संपादक

इगतपुरीनामा न्यूज, दि. २ – महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठे अग्नीतांडव अशी ओळख झालेल्या मुंढेगाव येथील जिंदाल कंपनीतील भयाण आग आज शमवली जाईल. मात्र ह्या घटनेने चव्हाट्यावर आलेली जिंदाल कंपनी मात्र कायमच गूढ चर्चेचा विषय ठरली आहे. त्यामुळेचा अग्नितांडवाच्या घटनेत अवघे २ बळी आणि काही जखमी असल्याचे लोकांना मात्र अजिबात पटत नाही. देशाच्या कानकोपऱ्यातील हजारो कामगारांनी तुडुंब भरलेली जिंदाल ह्या घटनेतील नेमका बळीचा आकडा लपवत असल्याची खरमरीत चर्चा ह्या भागात सुरु आहे. आग लागलेल्या परिसरात झालेले १९ स्फोट आणि तालुकाभर दिसणारे आगीचे तांडव पाहता बळीचा आकडा किमान २०० पेक्षा अधिक असावा अशी दाट शक्यता इगतपुरी तालुक्यातील विविध भागात व्यक्त होते आहे. मोठ्या संख्येने काम करणाऱ्या तरुणी आणि युवक ह्या घटनास्थळी काम करत होते असे ह्या भागातले जाणकार सांगतात. त्यामुळे मृतांचा आकडा खरोखर चिंता वाढवणारा असेल असे मानायला जागा आहे.

ह्या सगळ्या अफवा आहे असे थोडा वेळ मानले तरी नक्कीच हा आकडा अभूतपूर्व आणि भयाण असणार आहे. मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी उच्चस्तरीय चौकशी करण्याचे घोषित केले आहेच. ही चौकशी करतांना आतापासूनच प्रशासनाने सूक्ष्मपणे काळजी घ्यायला हवी. असे न झाल्यास मोठ्या झालेली जीवितहानी गूढ घटना बनून राहील. घटनेनंतर काही तासात ह्या कंपनीतील हजारो कामगार आपल्या गावाकडे जाण्यासाठी मिळेल त्या वाहनाने निघून गेले. ह्या सगळ्यांच्या मनात भरलेली भीती आणि कंपनीतले वास्तव समजून निर्माण झालेली काळजीचे जीवितहानीसोबत कनेक्शन आहे अशी चर्चा औद्योगिक परिसरात व्यक्त झाली आहे. आग विझल्यानंतर बळी किती गेले ह्याची प्राधान्याने चौकशी करून संबंधित व्यक्तींच्या वारसांना योग्य ती नुकसानभरपाई जिंदालने द्यायला हवी. शासनाकडून तर भरपाई मिळेलच पण कंपनीने नैतिक जबाबदारी स्वीकारणे आवश्यक आहे. यासह ह्या घटनेच्या मुळाशी जाऊन जे कोणी अग्नीतांडवाच्या घटनेला जबाबदार असतील त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करणे अगत्याचे ठरेल. ह्या घटनेमुळे स्फोटक रसायने, प्लास्टिक आणि इंधन बाळगणाऱ्या सर्व कारखान्यांची युद्धपातळीवर तपासणी होणे काळाची गरज आहे.

Similar Posts

error: Content is protected !!