लेखन : कु. सोनाली कोसे, चंद्रपूर
नवीन वर्ष सुरू होताच सर्वांना खूप आनंद होतो. त्याच्या येण्याची वाट आपण आतुरतेने पाहत असतो. मग तेच वर्ष हळूहळू जुने होत जाते. आणि त्याच वर्षात आपल्या गोड कडू आठवणी दडून बसलेल्या असतात. तसेच वर्ष २०२२ सरतीला आले आहे. त्याला निरोप द्यायची वेळ आता आली आहे. काही लोकं प्रामाणिक तर काही लोकं स्वार्थी वृत्तीचे आपल्याला पाहायला मिळाले असतीलच. ह्या वर्षात अनेक लोक आपल्या संपर्कात आलेले असतील आणि त्यांच्यातील निरागसता, दुर्गुण, वागणूक, घमंडीपणा, त्यांच्यातील आत्मविश्वास, सुप्त गुण, चांगले वाईट विचारांचे लोकं असे अनेक गुण लोकांत आढळून आलेले असतील. त्यांच्यातून आपल्याला काही नवे शिकता आलं असेल.
वाईट परिस्थितीत साथ न देता, चांगल्या परिस्थितीत गोड बोलणाऱ्या लोकांकडूनही अनुभव मिळालं असेल. अशा अनुभवातूनच खूप काही शिकण्यासारखं असते. आपले कोण आणि परके कोण हे सहज कळते. आपल्या अगदी जवळचे म्हणजेच आई वडील, मित्र मैत्रिणी. आई वडिलांना वाटते की आपला मुलगा मुलगी खूप शिकून स्वतःच्या पायावर उभं होऊन आपलं नाव कमविलं पाहिजे. ह्या वर्षात तुम्ही त्यांच्या स्वप्नाकडे किती लक्ष, दुर्लक्ष देऊन नाव कमविलेत ते लक्षात येईल. वेळ ही एकदाच मिळते. त्यामुळे संधीचं सोनं करणे हे तुमच्या हातात असते. वारंवार ही वेळ येत नसते.
ह्या वर्षात झालेले भांडणं, एकमेकांप्रती असलेला राग द्वेष, मत्सर, हेवेदावे इत्यादी सगळं काही विसरून नव्या वर्षाचे स्वागत आपुलकीने करूया. जे झालं ते जुनं समजून त्याला दूर सारून अंधाराच्या वाटेकडे न जाता प्रकाशातील आशेच्या किरणाकडे वळूया. जेणेकरून आपल्याला कुविचारांचा अस्विकार करून खूप काही नव्या गोष्टी, विचार शिकायला मिळतील. अशाच आपुलकी, जिव्हाळा, स्नेहबंधाने नातं टिकवून ठेवण्याची सहनशीलता आपल्यात असायला हवी. अशाच काही चांगल्या वाईट २०२२ ह्या वर्षातील आठवणी नेहमी स्मरणात राहतील. २०२२ ह्या वर्षाला स्वखुशीने निरोप देऊन ह्या वर्षाचे स्वागत करूया व आपली वागणूक , विचारशक्ती अधिक प्रगल्भ बनवूया.