इगतपुरीनामा न्यूज, दि. २९ – इगतपुरी तालुक्यातील टिटोली जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील नवोपक्रमशील व तंत्रस्नेही शिक्षक सिद्धार्थ सपकाळे यांना यावर्षीचा महाराष्ट्र शासन क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. इगतपुरी तालुक्यातील आदिवासी दुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळा पिंपळगाव भटाटा, भावली खुर्द, कुरुंगवाडी यासारख्या अतिशय दुर्गम गावात त्यांनी प्रभावी काम केले आहे. विद्यार्थ्यांतील कलागुण ओळखून त्यांना तंत्रज्ञानाचे धडे देऊन शिक्षणाने सदृढ विद्यार्थी त्यांनी घडवलेले आहेत. यासह जागतिक स्तरावर विद्यार्थ्यांना ऑनलाईन सफर घडवून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवला. म्हणूनच त्यांना राज्य शासनाचा मानाचा पुरस्कार जाहीर झाला. राजकीय, सामाजिक व शैक्षणिक स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे आमदार हिरामण खोसकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, प्राथमिक शिक्षणाधिकारी भगवान फुलारी, गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड, गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील, शालेय पोषण आहार अधीक्षक प्रतिभा बर्डे, उमेश बैरागी, अनिल बागुल, जनार्दन कडवे, कैलास बोढारे, वैभव गगे, ज्ञानेश्वर बांगर, राज्य आदर्श शिक्षक प्रमोद परदेशी, तुकाराम सारुक्ते, टिटोली सरपंच अनिल भोपे आदींनी सिद्धार्थ सपकाळे यांचे अभिनंदन केले आहे. इगतपुरी तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या ह्या पुरस्काराचा अभिमान वाटतो अशी प्रतिक्रिया शिक्षकांनी दिली आहे.