सर्वोच्च कळसुबाई शिखरावर जाण्यासाठी रोपवे निर्मित करण्यासाठी हालचाली सुरू : स्थानिकांच्या समृद्धीसह पर्यटकांसाठी आनंदाची बातमी

इगतपुरीनामा न्यूज, दि. ११

इगतपुरी तालुक्याच्या हद्दीवरील कळसुबाई हे सर्वोच्च शिखर असून वर्षभर ह्या ठिकाणी हजारो पर्यटक भेटी देत असतात. ह्यामुळे इगतपुरी तालुक्यासह कळसुबाई परीसरातील अनेक लोकांना रोजगार मिळतो. ह्या शिखरावर जाण्यासाठी रोपवे व्हावा अशी राज्यातील अनेक पर्यटकांची मागणी आहे. त्यानुसार अकोलेचे आमदार डॉ. किरण लहामटे यांचाही पाठपुरावा सुरू असतो. राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या बैठकीत आमदार डॉ. किरण लहामटे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक जयश्री भोज, पर्यटन सहसंचालक धनंजय सावळकर यांनी सहभाग घेतला. त्यानुसार सामान्य पर्यटकांना कळसुबाई शिखरावर सुलभपणे जाण्यासाठी रोपवे निर्मित करण्यासाठी प्राथमिक स्वरूपात सर्वेक्षण करण्यात येणार आहे. सध्याची पर्यटक संख्या आणि नव्या सुविधेमुळे वाढणारे संभाव्य पर्यटक यांच्यासह स्थानिकांना होणारा लाभ ह्यावर सविस्तर अहवाल देण्याचे निर्देश राज्यमंत्री अदिती तटकरे यांनी दिले आहेत. 

सह्याद्री पर्वत रांगेतील १ हजार ६४६ मिटर उंचीचे कळसूबाई शिखर आमच्या अनेक गिर्यारोहकांचे सर्वोत्तम ठिकाण आहे. कळसुबाई देवी जागरूक स्थान असल्याने आम्ही येथे नियमित जात असतो. पर्यटकांना रोपवे सुविधा निर्मित झाल्यास ह्या भागातील स्थानिकांना रोजगार तर मिळेलच पण पर्यटनाच्या दृष्टीने विविध सोयीसुविधांमध्ये भर पडेल. रोपवे निर्मित केला तरी शिखरावर जाण्याचा सध्याचा मार्ग बंद न करता दोन्हीही पर्याय सुरू असावे. आमचा यासाठी नेहमीच पाठिंबा राहिल.
- भगीरथ मराडे, अध्यक्ष कळसुबाई मित्रमंडळ घोटी

नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्याच्या हद्दीवर कळसुबाई हे राज्यातील सर्वात उंच शिखर आहे. देशभरातील गिर्यारोहक आणि निसर्गसौंदर्य अनुभवणारे पर्यटकांचा येथे राबता असतो. इगतपुरी तालुक्यातून ह्या शिखरावर जाण्यासाठी काही मार्ग असले तरी बारी गावातील जहागीरदारवाडी भागातून मुख्य मार्ग आहे. कळसुबाईच्या दर्शनासाठी आबालवृद्ध नेहमीच येथे जातात. ह्या परिसरात पर्यटकांच्या आवडीची अनेक महत्वाची ठिकाणे आहेत. त्यामुळे कळसुबाई परिसर पर्यटनाचा केंद्रबिंदू आहे. त्यामुळे कळसुबाई शिखरावर जाण्यासाठी रोपवे सुविधा तयार करण्यासाठी आमदार डॉ. किरण लहामटे यांचा नेहमी प्रयत्न असतो. त्यानुसार राज्यमंत्र्यांनी याबाबत निर्णय घेण्यासाठी निर्देश दिले असल्याने आगामी काळात पर्यटकांची जुनी मागणी पूर्ण होणार आहे.

कळसुबाई माता

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!