इगतपुरीनामा न्यूज, दि. २७ – २३ ते २५ डिसेंबर पर्यंत नाशिकच्या रॉयल रायडर्सकडून राईडचे आयोजन करण्यात आले. नाशिक मनपा स्थायी समितीचे सभापती गणेश गिते यांच्या हस्ते शुक्रवारी निमाणी बस स्टॉप येथून झेंडा दाखवून सुरुवात झाली. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित या राईडमध्ये ७५ सायकलिस्ट सहभागी झाले. यात १३ वर्षाच्या स्वराज कराले याच्यासह ७ महिला आणि ६८ वर्ष वयाचे रायडर्सचा सहभाग होता. नाशिकसह संगमनेर, घोटी, येवला, नारायणगाव, दोंडाईचा, मालेगाव, लासलगांव, वैजापूर, जळगाव येथून सायकलिस्टने सहभाग घेतला.
१५० किमी वांसदा येथे पहिला मुक्काम, दुसऱ्या दिवशी १५५ किमी अंतर कापून राजपीपलाचा अवघड घाट, तिसऱ्या दिवशी २३ किमी कापून सकाळी ८ वाजता स्टॅचू ऑफ यूनिटी येथे रायडर्स पोहोचले. सर्व प्रवास निसर्गाच्या सानिध्यात झाला. स्टॅचू दर्शन, वाचनालय, बगीचा पाहुन सर्व थक्क झाले. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर ह्या राईडमुळे उत्साह निर्माण झाली. परतीच्या प्रवासात कुबेर, नीलकंठ धाम दर्शन करून सोमवारी सकाळी सर्व रायडर्स नाशिकला पोहोचले. समन्वयक डॉ. आबा पाटील यांनी आयोजन केले होते. राजेंद्र कोटमे पाटील यांनी नियोजनाची बाजू सांभाळली. तांत्रिक सहाय्य राजेंद्र राजोळे, संदीप दराडे यांनी केले.