ब्राईट इंग्लिश मिडीयम शाळेच्या प्रांगणात फुलला बाल आनंद मेळावा

प्रभाकर आवारी : इगतपुरीनामा न्यूज, दि. २७ – संस्कार हा बाल्यावस्थेच्या जडणघडणीचा मुख्य पाया आहे. त्यातूनच आदर्श नागरिक! आदर्श भारत! घडू शकतो. वैविध्यपूर्ण उपक्रमांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची धुरा सांभाळणाऱ्या मानवधन सामाजिक शैक्षणिक विकास संस्था नाशिक संचलित ब्राईट इंग्लिश मीडियम स्कूल वाडीवऱ्हे येथे बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष प्रकाश कोल्हे यांनी केले. या बाल आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकवृंदानी जगातील सात आश्चर्येपैकी पृथ्वीवरील अद्भुत अशा नैसर्गिक किंवा बांधल्या गेलेल्या ठिकाणे व वास्तू ह्याचा देखावा रेखाटला. विद्यार्थ्यांनी स्वतः अभ्यास करून प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घेऊन त्याविषयी त्यांनी आपल्या मॉडेल्स मधून माहिती देण्याचा उत्कृष्ट असा प्रयत्न केला.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे संस्थापक प्रकाश सुकदेव कोल्हे, सचिव ज्योती कोल्हे, समाजसेवक डाॅ. मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, वाडीवऱ्हेचे वरिष्ठ पोलीस भगवान खोरले, मुख्याध्यापिका सुरेखा आवारे उपस्थित होत्या. पाहुण्यांच्या स्वागतासाठी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले. यावेळी श्री. कोल्हे यांनी विद्यार्थ्यांनी बनवलेल्या कलाकृतींचे कौतुक केले. त्यांच्या ज्ञान, कौशल्या विषयी मला सार्थ अभिमानच नाही तर गर्व आहे. हे विद्यार्थी नक्कीच आदर्श भारत घडवतील! असा विश्वास व्यक्त केला. यावेळी पालकांनी कार्यक्रमाचे साक्षीदार होऊन, विद्यार्थ्यांना प्रेम आणि प्रोत्साहन दिले. विद्यार्थ्यानीही कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद घेतला. सूत्रसंचालन सोनाली पाटीलझालं शिवानी चव्हाण यांनी केले. यावेळी शिक्षकवृंद, पालकवर्ग, विद्यार्थी उपस्थित होते.

Similar Posts

error: Content is protected !!