
इगतपुरीनामा न्यूज, दि. २५ – ग्रामीण आदिवासी भागातील मुलांमध्ये साहित्य लेखन कला ही नष्ट झाली आहे. त्यासाठी ऐकण्याचे व वाचण्याचे कौशल्य आत्मसात करणे गरजेचे आहे. शेंडी,भंडारदरा परिसरातील विद्यार्थी निसर्गाच्या सानिध्यात राहतात. त्यांनी लिखाणाची कला अवगत करणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाच्या अभ्यासक्रमातील अनेक पुस्तकांमध्ये निसर्गावर कविता लिहिणारे रानकवी तुकाराम धांडे यांनी केले. यावेळी रानकवी धांडे यांनी विद्यार्थ्यांना भूगोल, पुनर्वसन, समुद्रमंथन, महासत्ता, सासूचा उपदेश, लठ्ठ बायको, नवविवाहित स्त्री यावर विविध स्वलिखित कविता ऐकून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा या विषयाचे अहमदनगर जिल्हा तज्ञ प्रशिक्षक प्रा. अमोल चंदनशिवे होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात ११ वी व १२ वी या वर्गासाठी पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा हा विषय अनिवार्य असला तरी त्या विषयाकडे विद्यार्थी गांभीर्याने घेत नाहीत. परंतु आपले भविष्य चांगले जगायचे असेल तर पर्यावरण संवर्धन करण्याची जबाबदारी युवकांची आहे. यातून ग्रामीण व शहरी भागाचा विकास होईल. लोकसहभागातून शासनाच्या सहकार्याने पर्यावरणाचा समतोल राखून युवकांनी पर्यावरण बचाव करणे गरजेचे आहे. उत्तम आरोग्य, स्वच्छता, स्वावलंबता, कौशल्य व विकास या ग्रामविकासाच्या पंचसूत्रीच्या सहाय्याने ग्राम, शहर विकास करू शकतो यावर मार्गदर्शन केले.
युवक कसा असावा यावर कवियत्री सुषमा नाईकनवरे-झापाळे यांची स्वलिखित कविता “तारुण्याच्या उंबरठ्यावर” त्यांनी ऐकवली. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले नामदेव पटेकर गुरुजी यांनी आपल्या कविता ऐकवून विद्यार्थ्यांचे मनोरंजन केले कार्यक्रम प्रसंगी प्राचार्य डी. एन. रोंगटे, पर्यवेक्षक बाबाजी वैद्य, प्रा. नरेश खाडगीर, कार्यक्रम अधिकारी प्रा. महेश पाडेकर, सहकार्यक्रम अधिकारी प्रा. राजेंद्र चव्हाण,.प्रा. अनुसया वाळेकर, अनिल खाडे आदी उपस्थित होते. समारोप कार्यक्रम प्रसंगी उत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून ऋतिक सगभोर, उत्कृष्ट ग्रुप लीडर सोमनाथ गांगड, उत्कृष्ट स्वयंसेविका जयश्री घारे, राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थी प्रतिनिधी संजना सुरनर यांची निवड करून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. महेश पाडेकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी संजना सुरनर तर आभार शितल कोरडे हिने मानले.