कैलास फोकणे पाटील : इगतपुरीनामा न्यूज, दि. १२ – राज्यातील पोलीस पाटलांच्या विविध मागण्या गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. यासाठी अनेकदा निवेदन देण्यात आली. मात्र सरकारने गंभीरतेने विचार केला नाही. यामुळे महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील गाव कामगार संघ आणि इतर संघटना आक्रमक झाल्या आहेत. म्हणून २२ डिसेंबरला नागपूर येथे हिवाळी अधिवेशनावर राज्यातील हजारो पोलीस पाटील धडक देणार आहे. या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन राज्याध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील, राज्यसचिव कमलाकर मांगले पाटील यांनी केले आहे. राज्यातील पोलीस पाटील यांच्या मागण्या मान्य करुन घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील गाव कामगार संघाचे राज्याध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील, राज्यसचिव कमलाकर मांगले पाटील परिश्रम घेत आहे. राज्यभर दौरे करुन पोलीस पाटलांमध्ये त्यांनी जागृती केली. त्यामुळे राज्यभरातील पोलीस पाटील एकवटले असून नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर धडक देणार आहे.
पोलीस पाटलांच्या मानधनात वाढ करून दरमहा किमान १८ हजार रुपये मिळावे, निवृत्तीचे वय ६० वर्षा वरून ६५ वर्षांपर्यंत करावे, निवृत्तीनंतर किमान ५ लाख रुपये ठोस रक्कम मिळावी, ग्राम पोलीस अधिनियम १९६७ मध्ये दुरुस्ती करण्यास प्राधान्य देण्यात यावे, नूतनीकरण पहिल्या पाच वर्षानंतर कायमचे बंद करण्यात यावे, गृह व महसूल विभागातील पद भरती करताना पोलीस पाटलांना प्रत्येकी ५ टक्के आरक्षण मिळावे, पोलीस पाटलांचा ५ लाखांचा विमा, पाटलांसह त्यांच्या कुटुंबीयांचा मेडिक्लेम काढावा, अनुकंपा तत्व सुरु करावे, प्रवास भत्ता व स्टेशनरी साहित्य खर्चासाठी दरमहा ३ हजार रुपये मानधनासोबतच मिळावेत, पोलीस स्टेशन व पोलीस चौकी असलेल्या व नव्याने शहरीकरण झालेल्या गावातील कार्यरत पोलीस पाटलांना त्यांच्या निवृत्ती काळापर्यंत कायम ठेवण्यात यावे, नक्षल प्रभावित जिल्ह्यामध्ये मयत पोलीस पाटलाच्या कुटुंबीयांना नोकरी आणि २० लाख रुपये शासनातर्फे देण्यात यावे अशा मागण्या आहेत. यासाठी राज्यातील पोलीस पाटील अधिवेशनावर धडक देणार आहे.
संघाचे राज्याध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील, महासंघाचे राज्याध्यक्ष मोहनराव शिंगटे अण्णा, फाउंडेशनचे राज्याध्यक्ष राजकुमार यादव पाटील, महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील अमरावती अध्यक्ष प्रफुल गुल्हाणे पाटील, निरंजन गायकवाड पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी कार्यकारी अध्यक्ष श्रीकृष्ण साळुंखे पाटील, भृंगराज परशुरामकर पाटील, राज्य उपाध्यक्ष ज्ञानेश्वर राव, महाजन पाटील, संपतराव जाधव, राज्य सल्लागार समिती अध्यक्ष चिंतामण पाटील मोरे, राज्य संघटक बळवंत काळे पाटील, नवनाथ धुमाळ पाटील, राज्य सहसचिव गोरखनाथ टेमकर पाटील, खान्देश विभाग प्रमुख दादासाहेब कारभोर पाटील, कोकण विभाग अध्यक्ष साईनाथ पाटील, सोमनाथ पाटील मुळाणे, अशोकराव सांगळे, नाशिक जिल्हाध्यक्ष अरुण पाटील बोडके, सचिव रवींद्र जाधव, सर्व महिला आघाडी व तालुकाध्यक्ष परिश्रम घेत आहे.
पोलीस पाटील पद हे गावातील महसूल आणि गृह विभागाचा महत्त्वाचा कणा मानला जातो. राज्यातील सर्व पोलीस पाटील गेल्या अनेक वर्षापासून गावातील सर्व माहिती शासनाला पुरवणारा एक दुवा म्हणून काम करत आहे. असे असतांना त्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे सरकार गंभीरतेने बघायला तयार नाही. त्यामुळे आम्हाला मागण्या मंजुर करुन घेण्यासाठी हिवाळी अधिवेशनावर धडक देण्याशिवाय पर्याय राहीलेला नाही.
- चिंतामण पाटील मोरे, अध्यक्ष, राज्य सल्लागार समिती