निलेश काळे : इगतपुरीनामा न्यूज, दि. 6 – निराधार योजनेची पेन्शन चालू करायची आहे असे सांगून खरेदीखतावर सह्या घेऊन बळकावलेली जमीन अखेर चार वर्षांनी मूळ महिलेला मिळाली आहे. पिंपळगाव मोर ता. इगतपुरी येथील माजी चेअरमन पंढरीनाथ काळे, ॲड. गणेश ठाकरे, चंद्रकांत गांगुर्डे यांच्या बहुमोल सहकार्याने आदिवासी महिलेला न्याय मिळाल्याने सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. शिरसाने ता. चांदवड येथील गरीब आदिवासी महिला सुमन नामदेव बर्डे यांची गट नं. ८५ अ/२ ही साडेतीन एकर शेतजमीन आहे. श्रीमती बर्डे यांनी रावसाहेब वसंतराव जाधव यांना कसण्यासाठी जमीन अर्ध्या हिस्स्याने दिली होती. अडाणी असल्याचे जाणून निराधार योजनेची पेन्शन चालू करण्याचे खोटे सांगून सुमन बर्डे यांचे खरेदीखतावर अंगठे घेतले. श्रीमती बर्डे आदिवासी असल्याने खरेदीकामी परवानगी आवश्यक असल्याने जिल्हाधिकारी यांच्याकडील परवानगी खरी असल्याचे भासवून खरेदीखताची फेरफार नोंद क्र. १३७२ करून साडे तीन एकर जमीन रावसाहेब जाधव यांनी स्वतःच्या नावावर करून घेतली.
बऱ्याच कालावधीनंतर श्रीमती बर्डे यांनी जमीन स्वतः कसायची असल्याचे सांगताच जमीन माझी असून तुझा संबंध नसल्याचे जाधव यांनी सांगितले. श्रीमती बर्डे यांनी कागदपत्रे जमा करत असल्याची चाहूल लागताच जाधव यांनी २६/१२/२०१३ रोजी फेरफार नोंद २०३४ रोजी पत्नी मीना रावसाहेब जाधव, वहिनी वर्षा योगेश जाधव व सुनीता संतोष जाधव यांचे नावे वाटपपत्राने करून दिल्या. सुमन बर्डे यांनी रावसाहेब जाधव, पत्नी व दोन वहिनींविरोधात तहसिलदार चांदवड यांचेकडे जमीन प्रत्यार्पित करण्यासाठी दावा दाखल केला. तहसिलदार मनोज देशमुख यांनी १४/०७/२०१५ रोजी बर्डे यांच्या बाजूने आदेश देऊन ७/१२ वरील सर्व नावे कमी करून सुमन बर्डे यांचे नाव लावण्यात आले. तहसिलदारांच्या आदेशानंतरही रावसाहेब जाधव यांनी महाराष्ट्र महसूल न्यायप्राधिकरण, उच्च न्यायालय, महसूल मंत्री, महसूल आयुक्त यांचे कडे अपिल दाखल केले. परंतु त्याचा काहीही एक उपयोग झाला नाही. अखेर सुमन बर्डे यांना तहसिलदार चांदवड यांनी मंडळ अधिकारी वडाळीभोई यांनी दि. २१/११/२०२२ रोजी प्रत्यक्ष जागेवर जाऊन कब्जा दिला.