
इगतपुरीनामा न्यूज, दि. ३ – इगतपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत काळूस्ते बिटातील भाम धरणाच्या शेजारील जंगलामध्ये मोठ्या प्रमाणात अवैधरित्या गावठी दारू बनवण्याचे काम सुरू होते. याबाबतची माहिती इगतपुरी पोलीसांना समजताच पोलीस अधिक्षक शहाजी उमाप, अप्पर पोलीस अधिक्षक माधुरी कांगणे यांच्या मार्गदर्शनाखाली इगतपुरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सोपान राखोंडे यांनी पोलीस पथकासह याठिकाणी धाव घेतली. पथकाने या ठिकाणी छापा टाकुन गावठी दारूसाठी लागणारे रसायन जागेवरच नष्ट केले. पोलिसांची चाहुल लागताच दारु बनवणाऱ्या इसमांनी थेट जंगलात पळ काढला. दारू बनवणाऱ्या आरोपींचा पोलीस शोध घेत असुन आरोपी काळू अंबु गावंडा रा. काळुस्ते पत्र्याचीवाडी याच्या विरोधात इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.