केंद्रप्रमुखांना झालेल्या मारहाणीला जबाबदार कोण ? : शिक्षकांना बळीचा बकरा बनवण्यासाठी कोण आहे सक्रिय ?

इगतपुरीनामा न्यूज, दि. 15

आज सकाळी इगतपुरी तालुक्यातील दरेवाडी येथील शाळा बंद करण्याच्या प्रशासकीय आदेशाचे पत्र वाचत असताना केंद्रप्रमुख माधव उगले यांच्यावर शारीरिक हल्ला करण्यात आला. यात ते जखमी झाले आहेत. मात्र अशा प्रकारच्या निषेधार्ह घटनेला जबाबदार कोण असा सवाल शिक्षकांमध्ये उपस्थित झाला आहे. आमची शाळा बंद करू नका म्हणून इगतपुरीच्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयात पायपीट करून जाणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलेले आश्वासन सपशेल खोटे असल्याचे या घटनेमुळे उघडकीस आले. नेहमी खरे बोलावे असे बोधवचन शिकवणाऱ्या शिक्षकांचे कुटुंबप्रमुख गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील यांनी त्यावेळी फक्त वेळच मारून नेली असे म्हणावे लागेल. संतापलेल्या लोकांचा आणि विद्यार्थ्यांचा राग कुठेतरी शांत होत असतांना गटशिक्षणाधिकारी, विस्ताराधिकारी यांनी गटविकास अधिकारी यांनी माधव उगले यांना संतप्त पालकांमध्ये शाळा बंद करण्याचे पत्र वाचायला लावले. ह्यामुळे आक्रमक पालकांकडून विद्यार्थ्यांची खोटे आश्वासन देऊन फसवणूक केल्यामुळे अशी चुकीची घटना घडली. ह्याच प्रकारची पुनरावृत्ती पिंप्री सदो येथील उर्दू माध्यम वर्ग बंद करण्याबाबत होण्याची शक्यता आहे. संबंधित वर्ग बंद करण्याच्या पत्राचे वाचन शिक्षकांनी करावे आणि अघटीत घटनेला सामोरे जावे असा त्याचा सरळ अर्थ आहे. म्हणून शिक्षकांना शैक्षणिक कामाच्या व्यतिरिक्त अन्य कोणतेही अशैक्षणिक काम सांगू नये, त्यामुळे निर्माण होणारा रोष शिक्षकांच्या जीवावर बेतू शकतो अशी प्रतिक्रिया अनेक शिक्षकांनी व्यक्त केली.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!