दीपक भदाणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. 27
शिवसेना पक्षप्रमुख राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी दि. ३० रोजी पुरोगामी विचारांची ज्वलंत संघटना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या ३१ व्या वर्धापन दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई नाका परिसरातील भाभानगर येथील कर्मवीर दादासाहेब गायकवाड सांस्कृतिक सभागृहात दुपारी ३ वाजता या सोहळ्याची सुरुवात होणार आहे. आगामी महापालिका जिल्हा परिषद निवडणुकांबरोबर राज्यातील वाढती बेरोजगारी यासह विविध प्रश्नांवर चर्चा होणार आहे. शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. यावेळी महिला पदाधिकाऱ्यांसह नाशिकचे निरीक्षक डॉ. संदीप कडलग, जिल्हाध्यक्ष डॉ. स्वप्निल इंगळे, महानगरप्रमुख प्रफुल्ल वाघ, जिल्हा सचिव नितीन रोटे पाटील, उपजिल्हाप्रमुख विशाल अहिरराव, सरचिटणीस विकी गायधनी, लोकसभाध्यक्ष शरद लभडे, मंदार धिवरे, सागर पाटील, अक्षय आठवले, हरेश पाटील, राकेश जगताप, संकेत चराटे, चेतन पगारे, प्रथमेश पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज्यस्तरीय वर्धापन दिन सोहळ्यास संघटनेचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे, महासचिव सौरभ खेडेकर, मुख्य प्रवक्ते गंगाधर बनबरे यांच्यासह प्रदेश पातळीवरील नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात शाहिरी जलसाने झाल्यानंतर राज्य पातळीवरील मान्यवर यावेळी मार्गदर्शन करणार आहेत. संभाजी ब्रिगेड महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारी संघटना असून आगामी महापालिका जिल्हा परिषद व अन्य निवडणूका शिवसेनेची युती करून लढवणार आहेत. संभाजी ब्रिगेड पक्षाची घोषणा झाल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये उर्जितावस्था निर्माण करण्यासाठी दरवर्षी वर्धापनदिन साजरा केला जातो. हा मान यावर्षी नाशिकला मिळाला असल्याचे सांगत राज्यातील औद्योगिक प्रकल्प बाहेर राज्यात जात असल्यामुळे युवकांवर आलेले बेरोजगारीचे सावट, घडणाऱ्या अप्रिय घटना यावर सोहळ्यात चर्चा होणार असल्याची माहिती डॉ. स्वप्निल इंगळे यांनी दिली. आगामी महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनेने शिवसेनेकडे एकूण जागांपैकी २० टक्के जागांची मागणी केल्याचे त्यांनी सांगितले. व्यापारी आणि नेते मालामाल शेतकरी कंगाल ही अवस्था असल्यामुळे नेत्यांना धडा शिकविण्यासाठी संभाजी ब्रिगेड कटिबद्ध राहील. तसेच संघटनेचे नाशिकमध्ये राज्यस्तरीय कार्यालय उभारण्याचा मनोदय प्रफुल्ल वाघ यांनी व्यक्त केला. राज्यातील विविध प्रश्नांसाठी युवकांनी राजकारणात मोठ्या संख्येने पुढे येण्याची गरज डॉ. संदीप कडलग यांनी व्यक्त केली. नाशिक मधील राज्यस्तरीय वर्धापन दिन सोहळ्यात काही महत्त्वाचे ठराव पारित करणार येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
संभाजी ब्रिगेड गेली अनेक वर्ष पुरोगामी चळवळीत काम करत आहे. राज्यभरातल्या अनेक प्रश्नांवर संभाजी ब्रिगेडने प्रखर आंदोलन करत न्याय मिळवून दिला आहे. पुरोगामी विचारांची ज्वलंत संघटना म्हणून संभाजी ब्रिगेडचे नाव मोठ्या आदराने घेतले जाते. ज्या ज्या वेळेस महापुरुषांचा चुकीचा इतिहास किंवा महापुरुषांची बदनामी केली जाते त्यावेळेस संभाजी ब्रिगेडने वेळोवेळी आंदोलन करत महापुरुषांची बदनामी थांबवली आहे. त्यामुळे नाशिकमध्ये होणारे राज्यस्तरीय वर्धापन दिन सोहळा मोठ्या जल्लोषात व ताकतीने साजरा होणार आहे. राज्यभरातून संघटनेचे राज्य पदाधिकारी तसेच जिल्हा पदाधिकारी प्रत्येक जिल्ह्यात वर्धापन दिन सोहळा यशस्वी करण्यासाठी ताकतीने तरुणांना नाशिकमध्ये आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. शिवसेना फुटल्यानंतर शिवसेनेच्या पाठीशी संभाजी ब्रिगेड मोठ्या ताकतीने पुढे आली राज्यभरात होणाऱ्या विविध प्रश्नांवर एकत्र काम करण्यासाठी शिवसेनेच्या मदतीला संभाजी ब्रिगेड सरसावली. त्यामुळे पडत्या काळात संभाजी ब्रिगेड पाठीशी राहिल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी संभाजी ब्रिगेड पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले होते. त्याच पार्श्वभूमीवर नाशिकमधील संभाजी ब्रिगेडचा वर्धापनदिन सोहळा उद्धव ठाकरे यांची शिवसेना व संभाजी ब्रिगेड एकत्र येऊन साजरा करत असल्याने संभाजी ब्रिगेडचा वर्धापन दिन सोहळा विचारांची मेजवानी ठरेल. सर्व नाशिकचे पदाधिकारी कार्यकर्ते गेली महिनाभर कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत.