पदवीनंतरच्या करिअरचे विविध पर्याय

पदवीधर झाल्यानंतर विद्यार्थी व पालकांना पदवीनंतर काय ? हा प्रश्न उपस्थित होतो. पदवीनंतरच्या काही पर्यायांचा परिचय करून देणारा लेख.

प्रा. देविदास गिरी, इगतपुरी 9822478463

पदवीनंतर काय ?
बी. ए. , बी. कॉम., आणि बी. एस्सी. या तिन्ही शाखांच्या परीक्षा संपल्यावर आणि निकाल लागल्यावर पुढे काय ? असा प्रश्न विद्यार्थी व पालकांना पडतो. विद्यार्थ्यांना योग्य वेळी चांगल्या प्रकारचे मार्गदर्शन मिळाले तर भविष्यात चांगले करिअर विद्यार्थी घडवू शकतो. वरील तिन्ही शाखेच्या विद्यार्थ्यांना भरपूर पर्याय आहेत. त्यातील महत्त्वाच्या पर्यायांचा परिचय या लेखात देत आहे.
आवडीला प्राधान्य
विद्यार्थी व पालकांनी ही गोष्ट प्रकर्षाने लक्षात घ्यावी. विद्यार्थ्यांचा कल, आवड विचारात घेऊन पर्यायांचा विचार करावा. उगाचच त्याच्या आवडी विरूद्धचे क्षेत्र निवडू नये. बरेच पालक ही चूक करतात. त्यामुळे आपण विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविण्याऐवजी बिघडवतो हे लक्षात घ्या. पाल्य ही आपली संपत्ती आहे याची जाणीव सतत ठेवा.
पदव्युत्तर पदवी
पदवी प्राप्त केलेले ७५ टक्के विद्यार्थी हा मार्ग निवडतात. आज उच्च शिक्षणाची गंगा गाव खेडयापर्यंत पोहोचत आहे. असे असले तरी पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्यांची संख्या भारतात ६ टक्के आहे. असे असले तरी आज पदव्युत्तर पदवीसाठी मुले मोठ्या प्रमाणात आग्रही असल्याचे दिसते. ज्या विषयात पदवी घेतली आहे त्याच विषयात पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांनी घेणे केव्हाही फायद्याचे ठरते. पदव्युत्तर पदवीत प्रथम वर्ग मिळविण्याचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर नेहमी ठेवावे म्हणजे पदव्युत्तर पदवी वाया जात नाही.
स्पर्धा परीक्षा
पदवीनंतर अत्यंत महत्त्वाचे आणि जीवनात उज्ज्वल भवितव्य घडविणारे क्षेत्र म्हणजे स्पर्धा परीक्षा होय. आज महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा कल याकडे वाढतो आहे. ही आशादायक बाब होय. एमपीएससी, युपीएससी, स्टाफ सिलेक्शन कमिशन, बँक, रेल्वे आदी क्षेत्रांत भरपूर संधी आहेत. बँक आणि वित्तीय क्षेत्रात भविष्यात काही लाख पदांची भरती अपेक्षित आहे. त्यामुळे याचाही विद्यार्थ्यानी मोठ्या प्रमाणात विचार करावा. या माध्यमातून प्रवेश केल्यास प्रत्येक क्षेत्रात बढतीच्या अनेक संधी आहेत. त्यामुळे स्पर्धा परीक्षा हा एक उत्तम असा पर्याय आहे. यात थोडे कष्ट घ्यावे लागतील. अभ्यास करावा लागेल. बरेच विद्यार्थी अभ्यासाला घाबरतात. परंतु हा न्यूनगंड काढून टाका. तुम्हाला तुमचे चांगले भवितव्य प्राप्त करता येईल.
संधीचे सोने करा
पदवी मिळविलेल्या विद्यार्थ्याने प्रत्येक संधीचे सोने केले पाहिजे. कारण आज भारतात पदवी मिळविणारे विद्यार्थी खूप आहेत असे नाही. पदवीनंतर मोठ्या प्रमाणात तसेच अनेक क्षेत्रांमध्ये आपण प्रवेश करू शकतो हे लक्षात घ्या.
            
( लेखक इगतपुरी येथील के. पी. जी. महाविद्यालयाचे उपप्राचार्य असून स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शक आहेत. )