इगतपुरीनामा न्यूज, दि. 26
संगमनेर तालुक्यातील सोनोशी येथील प्रगतशील शेतकरी कारभारी ( दादा ) चिमाजी गीते यांच्या प्रथम स्मृतिप्रित्यर्थ बंगलोर येथील हॉर्टिकल्चर विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. कृष्णा रेड्डी व जुन्नर तालुक्यातील ओतूर येथील प्रगतशील शेतकरी अजित घोलप या दोघांना यंदाचा कृषी विज्ञान पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्कारांचे वितरण विधानसभा उपाध्यक्ष ना. नरहरी झिरवळ, आमदार सुधीर तांबे, आमदार माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते शुक्रवारी ( दि. २८ ) होणार आहे. संगमनेर तालुक्यातील सोनोशी येथील आपलं सर्वस्व शेतीसाठी देणारे शेतकरी कारभारी चिमाजी गिते यांच्या प्रथम स्मृतिदिनापासून दरवर्षी वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ शेती क्षेत्रात संशोधन करणाऱ्या व एकरी जास्तीत जास्त उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा व एक शास्त्रज्ञाला पुरस्कार देऊन गौरव करण्याचे निश्चित केले आहे.
कार्यक्रमाचे आयोजन कारभारी ( दादा ) शिवार प्रतिष्ठानने केले असून यावेळी नामफलक अनावरण, कृषी दिनदर्शिका प्रकाशन आणि कृषी विज्ञान पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. ह्यावर्षीचा प्रथम पुरस्कार बेंगलोरच्या भारतीय हॉर्टिकल्चर संशोधन संस्थेतील वनस्पती रोग निदान विभाग प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. कृष्णा रेड्डी यांनी टोमॅटो वरील टोपोव्हायरस ( टॉमॅटो लूज व पिवळे होणे ) यावर संशोधन व उपाय या विषयावर आशिया खंडात १५० च्यावर पेपर प्रकाशित केले. यांच्यासह पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील ओतूर येथील टोमॅटो व कांद्याचे एकरी विक्रमी उत्पादन घेणारे, शेत मजुराचा विमा काढणारे प्रगतशील शेतकरी अजित घोलप या दोघांना कृषी विज्ञान पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कारभारी ( दादा ) शिवार प्रतिष्ठानचे अध्यक्ष भाऊसाहेब गिते, पुणे येथील संशोधन आणि विकास संस्था अर्थात एआरडीईचे शास्त्रज्ञ डॉ. लहानू गिते, नाशिकच्या जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता हरिभाऊ गिते यांच्यासह गिते परिवाराने केले आहे.