चंद्रकांत जगदाळे : इगतपुरीनामा न्यूज – दिपावली म्हणजे चैतन्याचा जागर… प्रकाशाचा उत्साह वातावरणात पसरण्याचा हा उत्सव…अंधारावर विजय मिळविण्याच्या या काळात एक वृद्ध महिला अंधारात राहत असल्याबाबत समजताच महावितरणच्या अधिकाऱ्यांनी स्वखर्चाने त्या वृद्धेचे वीजबिलाची रक्कम भरून त्या वृद्ध महिलेचे घर प्रकाशमय केले. लासलगाव महावितरणचे शहर कक्ष सहायक अभियंता अजय साळवे यांनी दाखविलेल्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक परिसरात होत आहे. त्यांच्या कार्याचा जिल्हाभर गौरव होत आहे. लासलगावला शकुंतला पांडुरंग कुचेकर वय ७२ या निराधार वृद्ध महिला राहतात. आयुष्याच्या कठड्यावर आधार नसल्याने त्या छोटी कामं करत आला दिवस ढकलत आहेत. येथील घरामध्ये महावितरणने त्यांना वीज उपलब्ध करून दिली आहे. परंतु गेली काही महिन्यांपासून नियमित वीजबिल भरणे शक्य न झाल्यामुळे महावितरण कर्मचाऱ्यांनी नियमांच्या अधीन राहून शकुंतला कुचेकर यांच्या घराचा वीजपुरवठा बंद केला होता. तेव्हापासून त्या अंधारात राहत होत्या. दिवाळी निमित्त सगळीकडे उजळून निघालेलं असतांना शकुंतला कुचेकर यांचे घर अंधारात असलेबाबत महावितरणचे कर्मचाऱ्यांनी शहर कक्ष सहायक अभियंता अजय साळवे यांना सांगितले. तत्परतेने साळवे यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसोबत शकुंतला कुचेकर यांचे घर गाठले. त्यांची थकबाकीची रक्कम साळवे यांनी स्वखर्चाने ऑनलाईन जमा केली. ताबडतोब कुचेकर यांचा खंडित केलेला वीजपुरवठा सुरळीत करण्याचा आदेश साळवे यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना दिला. लागलीच शशिकांत जाधव, हरिष भागवत, समाधान साठे यांनी कुचेकर यांच्या घराची विजजोडणी पूर्ववत केली. दिपावली निमित्त महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सामाजिक बांधिलकीचे आदर्श उदाहरण घालून दिल्यामुळे अधिकाऱ्यांचे कौतुक होत आहे.
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group