धामडकीवाडीचे आदिवासी विद्यार्थी आणि गावकऱ्यांना युवा फ्रेंड सर्कलतर्फे विविध साहित्याचे वाटप : गरिबांच्या घरात दिवाळीनिमित्त युवा फ्रेंड सर्कलकडून सामाजिक उपक्रम

इगतपुरीनामा न्यूज, दि. 22

दीपावळीचा झगमगाट सगळीकडे सुरु असतांना त्यामध्ये वंचिताच्या जीवनातला काळाकुट्ट अंधार मात्र डोळस माणसाला दिसत नाही. ह्या अंधाराला हरवण्यासाठी दरवर्षी युवा फ्रेंड सर्कल ही नवतरुणांची संस्था धावत असते. यावर्षीही आदिवासी विद्यार्थी आणि नागरिकांच्या हृदयातील लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी ह्या तरुणांनी कंबर कसली. इगतपुरी तालुक्यातील धामडकीवाडी ह्या अतिदुर्गम आदिवासी पाड्यावरील विद्यार्थी आणि गावकऱ्यांना दिवाळीचा फराळ, लहान मुलांचे कपडे, थंडीपासून बचावासाठी टोप्या, हातमोजे वाटप करण्यात आले. धामडकीवाडी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक तथा आदर्श शिक्षक प्रमोद परदेशी यांचे मार्गदर्शन आणि साहाय्याने हा उपक्रम संपन्न झाला.

युवा फ्रेंड सर्कल संस्थेचे सार्थक कपूर, ओम ठाकूर, हर्षल चौधरी, सिद्धांत राजोळे, गिरीश पवार, जयदेव गवते, श्रीराम सोनवणे, नीरज बहिरम यांच्याकडून दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी हा सामाजिक उपक्रम पार पडला. समाजाच्या वंचित घटकाला आनंदाचे क्षण दीपावली काळात देण्यासाठी हे युवक कायमच आघाडीवर असतात. त्यांना आदर्श शिक्षक प्रमोद परदेशी यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभत असते. आज धनत्रयोदशीच्या पर्वावर धामडकीवाडी येथील गावकऱ्यांना दिवाळीचा फराळ, लहान मुलांचे कपडे, थंडीपासून बचावासाठी टोप्या, हातमोजे वाटण्यात आले. शिक्षक दत्तू निसरड, गोकुळ आगिवले शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, चांगुणा आगिवले ग्रामपंचायत सदस्य, धोंडीबाई आगिवले आशा वर्कर, लहानू आगिवले आदी गावकऱ्यांनी युवा फ्रेंड सर्कलच्या युवकांचे आभार मानले आहेत.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!