शाळा नाही ना.. मग आम्हाला शेळ्या द्या ; ४३ आदिवासी विद्यार्थी निघाले जिल्हा परिषदेवर : दप्तर जमा करुन राज्य बाल हक्क आयोग आणि सीईओ यांना भेटून करणार शेळ्यांची मागणी

शाळेसाठी लोकशाही मार्गाने आंदोलन सुरूच ठेवणार – भगवान मधे

इगतपुरीनामा न्यूज, दि. 11

इगतपुरी तालुक्यातील अतिदुर्गम आणि विस्थापित असणाऱ्या दरेवाडी या गावातील 43 चिमुरडे विद्यार्थी आपले दप्तर जमा करण्यासाठी नाशिकच्या जिल्हा परिषदेवर निघाले आहेत. तुम्ही आमची शाळा बंद केली आता आम्हाला शाळा नको.. म्हणून वळायला शेळ्या द्या अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. नाशिक जिल्ह्यात राज्य बाल हक्क आयोगाचा दौरा असून आयोगाच्या सदस्यांना विद्यार्थी भेटून शेळ्या देण्याची विनंती करणार आहेत. दरेवाडी गावातून हे विद्यार्थी थेट नाशिकच्या गोल्फ क्लब मैदानावर जमून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना भेटणार आहेत. हे आंदोलन सीताराम गावंडे यांच्या नेतृत्वाखाली होत आहे. दरेवाडी शाळा बंद केल्यामुळे शिक्षण हक्क कायद्याची पायमल्ली झाली आहे. ह्या कायद्यानुसार ६ ते १४ वयोगटातील बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण उपलब्ध करून देण्याची तरतूद आहे. शाळा बंद झाल्यामुळे गोरगरीब, वंचित आणि मुली शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर जातील. कमी पटसंख्या असणाऱ्या बहुतांश शाळा दुर्गम आणि वाहतुकीच्या सोयी सुविधा नसणाऱ्या ठिकाणी आहेत. या शाळा बंद झाल्यास इथे शिकणारे आदिवासी विद्यार्थी शाळाबाह्य होण्याची भीती आहे. दरेवाडी शाळा बंद प्रकरणी लोकशाही मार्गाने लढा तीव्र करू अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते भगवान मधे यांनी “इगतपुरीनामा”ला दिली.

भाम धरणामुळे विस्थापित झालेल्या दरेवाडी ह्या गावातील जिल्हा परिषद शाळा मागील महिन्यात बंद करण्यात आली. ही शाळा बंद करू नये म्हणून विद्यार्थी इगतपुरीला पायी जाऊन आंदोलन करत होते. यावेळी गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना लेखी स्वरूपात शाळा बंद करणार नाही असे आश्वासन दिले. त्यानंतर पालकसभेत शाळा बंद करण्याचे पत्र वाचून दाखवणारे केंद्रप्रमुख माधव उगले यांना मारहाण झाली. तेव्हापासून ही शाळा बंद आहे. विद्यार्थी एकमेकांना शिकवून शाळेचा विसर पडू देत नाही. आता आम्हाला शाळा नको.. वळायला शेळ्या द्याव्यात अशी अनोखी मागणी घेऊन 43 विद्यार्थी जिल्हा परिषद कार्यालयाकडे निघाले आहेत. आपले दप्तर पाठीला लावून आणि सोबत शेळ्या घेऊन विद्यार्थी घोषणा देत आहेत. प्रशासनाचा निषेध करून मुख्य कार्यकारी अधिकारी यांना भेटून दप्तर जमा करण्यात येणार आहेत. यासोबत आम्हाला आता शेळ्या द्या अशी मागणी केली जाणार आहे. ज्यांनी राज्यात शिक्षणाची कवाडे खुली केली त्या महात्मा फुले यांच्या राज्यात विद्यार्थी शिक्षणाचा हक्क मागत आहेत. राज्य बाल हक्क आयोगाकडे भेटून कैफियत मांडणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते भगवान मधे यांनी सांगितले.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!