इगतपुरीनामा न्यूज, दि. 9
छत्रपती शिवरायांच्या नानाविध घोषणा आणि अनेक चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या मंजुळ आवाजातील ललकाऱ्या देत इगतपुरी तालुक्यातील टिटोली येथील उपसरपंच शिवभक्त अनिल भोपे यांचा वाढदिवस प्रचंड उत्साहात साजरा करण्यात आला. “शिवप्रताप गरुडझेप” ह्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या लोकप्रिय चित्रपटाच्या विविध कलाकारांनी अचानक आश्चर्याचा धक्का देऊन विद्यार्थ्यांच्या सोबत चित्रपटाचा मनमुराद आनंद लुटला. अनिल भोपे यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व कलाकारांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. चिमुकल्या विद्यार्थ्यांना भावलेल्या “शिवप्रताप गरुडझेप” ह्या चित्रपटाबद्धल विद्यार्थ्यांनी कलाकारांशी मनमोकळा संवाद साधत दिलखुलास आनंद लुटला. शिवरायांच्या भूमिकेतील खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी अनिल भोपे यांना दूरध्वनीद्वारे भरभरून शुभेच्छा दिल्या. टिटोली गावाला भेट देणार असल्याचे डॉ. कोल्हे यावेळी म्हणाले. नाशिक येथील सिटी सेंटर मॉलमध्ये हा भरगच्च सोहळा सर्वांनी अनुभवला.
इगतपुरी तालुक्यातील टिटोली येथील उपसरपंच अनिल भोपे हे नेहमीच विविध सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असतात. आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त त्यांनी नुकताच प्रदर्शित झालेला “शिवप्रताप गरुडझेप” हा लोकप्रिय चित्रपट टिटोली जिल्हा परिषद शाळेतील 100 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना चित्रपटगृहात दाखवला. यावेळी अचानक ह्या चित्रपटातील हिरोजी फर्जंदच्या भूमिकेतील रमेश रोकडे, येसाजी कंक यांच्या भूमिकेतील महेश फाळके, दावलजी भूमिकेतील निकेत मोरे, मुगली हशम भूमिकेतील देवेंद्र सरदार ह्या कलाकारांनी चित्रपट सुरु असतांना प्रवेश केला. डॉ. अमोल कोल्हे यांचे स्वीय सहाय्यक सागर जाधव हेही उपस्थित झाले. विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवरायांच्या घोषणा देत कलाकारांचे विशेष स्वागत केले. कलाकारांनी संपूर्ण चित्रपट विद्यार्थ्यांच्या सोबत बसून पाहिला. त्यानंतर कलाकारांनी मनमोकळा संवाद साधून चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरे दिली. हा चित्रपट संस्काराची पेरणी करणारा असून इतिहासाची खरी ओळख “शिवप्रताप गरुडझेप” या चित्रपटाने दिली असे विद्यार्थी म्हणाले. अनिल भोपे यांच्यामुळे दर्जेदार आणि अस्सल मराठी चित्रपट पाहून आनंद द्विगुणित झाला असे एक विद्यार्थिनी म्हणाली. यावेळी गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील, विस्ताराधिकारी श्रीराम आहेर, आगरी सेनेचे कार्याध्यक्ष अरुण भागडे, इगतपुरीनामाचे संपादक भास्कर सोनवणे, चित्रपट दिग्दर्शक धनराज म्हसणे, भगीरथ भगत, विशाल भोपे, शिक्षक मंगला शार्दुल, सिध्दार्थ सपकाळे, राजकुमार गुंजाळ, प्रतिभा सोनवणे, मंगला धोंडगे, योगिता पवार, भावना राऊत, सुविद्या भडांगे यावेळी उपस्थित होते.