इगतपुरीनामा न्यूज – देश विदेशातील शिक्षणपद्धतीसोबतच भारतातील विविध राज्यांच्या शिक्षणव्यवस्थेतील उत्तम गोष्टी टिपून त्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी राबवण्याचा प्रयत्न करणारे आमदार सत्यजीत तांबे यांनी पंजाबचे शिक्षणमंत्री हरज्योतसिंग बैस यांची भेट घेतली. सध्या वैयक्तिक कारणासाठी पंजाबच्या भेटीवर असलेल्या आ. तांबे यांनी आपल्या कामातून वेळ काढून शिक्षणमंत्र्यांशी शिक्षण क्षेत्रातील विविध विषयांवर चर्चा केली. तसंच पंजाबमधील शिक्षणाचं मॉडेल समजून घेत त्यांनी या मॉडेलचं कौतुकही केलं. या मॉडेलपासून प्रेरणा घेऊन राज्यातील शाळांमधील, विशेषत: सरकारी शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता कशी वाढवता येईल, या विषयावर चर्चा झाल्याचे आ. सत्यजीत तांबे यांनी स्पष्ट केले. सरकारी शिक्षणाच्या क्षेत्रात दिल्ली आणि पंजाब यांनी देशभरात आदर्श पायंडा पाडला आहे. दिल्लीतील पब्लिक स्कुलच्या मॉडेलची चर्चा फक्त देशातच नाही, तर इतर देशांमध्येही झाली होती. त्यानंतर अशाच प्रकारचे मॉडेल पंजाबमध्येही राबवण्यात आले. या मॉडेलद्वारे पंजाबमध्ये पालक-शिक्षक बैठकांवर भर देण्यात आला आहे. त्याशिवाय शाळा व्यवस्थापन समिती मजबूत करण्यासाठी या समितीच्या प्रत्येक बैठकीत शासनाचा एक प्रतिनिधी पाठवण्यास सुरुवात केली. त्यामुळे या समितीच्या कामात सुधारणा झाली.
सरकारी शाळांच्या गुणवत्तेसाठी लोकसहभाग आवश्यक असल्याची भूमिका आ. तांबे यांनी सातत्याने मांडली आहे. हाच धागा पुढे नेत आ. तांबे यांनी हरज्योतसिंग बैस यांच्याकडूनही सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. महाराष्ट्रात नवीन शैक्षणिक मॉडेल राबवण्यासाठी सहकार्य करू, असे आश्वासन शिक्षणमंत्री बैस यांनी आमदार सत्यजीत तांबे यांना दिले. या भेटीतून महाराष्ट्रातील शिक्षण पद्धतीत पुढील पिढ्यांना उपयुक्त ठरू शकेल अशा अर्थपूर्ण सुधारणांसाठी मार्ग खुला होईल, अशी आशा आ. सत्यजीत तांबे यांनी व्यक्त केली.
पंजाबमधील सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी करिअर गायडन्स शिबिरं घेतली जातात. तसंच विद्यार्थ्यांमधून उद्योजक घडवण्यासाठी आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपये देऊन त्यांना त्या पैशातून एखादा व्यवसाय करण्याचा प्रोजेक्टही दिला जातो. त्यामुळे त्यांच्यातील कल्पकता आणि उद्योजकता वाढीला लागते. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणाऱ्या या अशा विविध योजना पंजाबमध्ये राबवल्या जात आहे. विशेष म्हणजे १८ पेक्षा जास्त एनजीओ सरकारसह काम करत आहेत. त्यामुळे लोक सहभागाच्या माध्यमातून हे मॉडेल आणखी यशस्वी केले जात आहे. खासगी दौऱ्यातही विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी दिसतील त्या गोष्टी टिपणाऱ्या आमदार सत्यजीत तांबे यांना या मॉडेलचे आकर्षण होतेच. त्यामुळे पंजाबला गेल्यानंतर त्यांनी तेथील शिक्षणमंत्री हरज्योतसिंग बैस यांची भेट घेतली. या भेटीबाबतची माहिती त्यांनी एक्स (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडिया ॲपवरून जाहीर केली. पंजाबने सरकारी शिक्षणाच्या क्षेत्रात नेमक्या काय सुधारणा केल्या, हे त्यांनी जाणून घेतले. महाराष्ट्राने डोळसपणे इतर राज्यांमधील चांगल्या गोष्टी टिपण्याची गरज आहे. या गोष्टी आपल्या विद्यार्थ्यांसाठी आपण राबवू शकतो, असे आ. तांबे म्हणाले. राज्यातील अनेक सरकारी शाळांची दुरावस्था झाली असून शिक्षणाचा दर्जादेखील खालावत चालला आहे.