
इगतपुरीनामा न्यूज, दि. 28
इगतपुरी शहराला परतीच्या पावसाने चांगलेच झोडपले आहे. गेल्या 2 तासांपासून जोरदार पाऊस सुरू असल्याने शहरातील अनेक भागात पाणी तुंबले आहे. शहरातील पाणी पुरवठ्यासाठी सुरु असलेल्या पाईप लाईनच्या अर्धवट कामामुळे अनेक ठिकाणी खोदकामाच्या खड्डयात पाणी साचले आहे. पावसाळापूर्व नाले सफाई न केल्याने ह्याचा त्रास सर्वसामान्य इगतपुरीकर नागरिकांना होत आहे. यामुळे इगतपुरी नगरपरिषदेचा बेजबाबदार कारभार चव्हाट्यावर आला आहे. पाण्यामुळे शहरात तलावाचे स्वरूप आले असून नागरिक त्रस्त झाले आहेत.
नगरपरिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियोजनशून्य मनमानी कारभाराचा फटका लोकांना बसत आहे. त्यामुळे इगतपुरी शहरातील खालची पेठ, वसंत पवार नगर, धोबी गल्ली, लोया रोड इत्यादी परिसरातील घरांमध्ये नाली, गटार आणि रस्त्यावरील पाणी शिरले आहे. त्यातच विज गायब झाल्यामुळे शहरात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. अशी परिस्थिती इगतपुरी शहरातील इतरही भागात असून इगतपुरीच्या नागरिकांना कोणी वाली आहे का असा सवाल विचारला जात आहे.