कावनई शिवारात महिलेच्या गळ्यातील दीड लाखांचे दागिने ओढुन चोरट्यांचा पोबारा

प्रभाकर आवारी : इगतपुरीनामा न्यूज, दि. २९

मुकणे तेथील ग्रामपंचायत सदस्य रामभाऊ राव यांच्या आई अनुसयाबाई यांच्या गळ्यातील दीड लाख रुपये किमतीचे सोन्याचे डाग वाहनावरून आलेल्या चोरट्यांनी दिवसाढवळ्या गळ्यातुन ओढुन पळवल्याची घटना रविवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. कावनई शिवारात ही घटना घडली.

मुकणे येथील ग्रामपंचायत सदस्य रामभाऊ राव व त्यांचे कुटुंब कावनई रोडवरील वाघोबावाडी व बळवंतवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत शेतावर राहतात. तेथे त्यांचे किराणा दुकान आहे. रविवारी दुपारी घरी कोणी नसल्याने त्यांची आई अनुसयाबाई कचरू राव या दुकानावर थांबल्या होत्या. याच दरम्यान दुपारी दीड वाजेच्या दरम्यान दोन जण मोटारसायकलवरून आले. बिस्कीटपुडे घेण्याच्या बहाण्याने एकजण दुकानावर गेला व एकजण गाडीवरच थांबुन होता. याच वेळी अनुसयाबाई यांच्या गळ्यातील दोन सोन्याच्या पोती ( अंदाजे किंमत २ लाख ) गळ्यातुन हिसकावून दोघांनीही गाडीवरून पलायन केले. त्यांनी आरडाओरडा केला मात्र मोटारसायकलवरून दोघेही पसार झाले. या घटनेमुळे परिसरात घबराट पसरली असुन श्रीक्षेत्र कावनई जवळच असल्याने या रस्त्यावर नेहमीच वर्दळ असते. परिसरात महिलांच्या गळ्यातून सोने चोरीच्या घटना वाढत असुन घोटी पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!