इगतपुरीनामा न्यूज, दि. 14
कातकरी बांधव कायम दुर्लक्षित असून गरिबीचे जीवन जगत असतात. उभाडे येथील मुलीच्या मृत्यूमुळे कातकरी बालकांच्या विक्रीचे प्रकरण उघडकीस आले. ह्या पार्श्वभूमीवर कातकरी बांधवांसह अन्य आदिवासी बांधवांचे न्याय्य प्रश्न सोडवण्यासाठी इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांनी पुढाकार घेतला आहे. याबाबत आदिवासी विकास विभागाचे उपायुक्त संदीप गोलाईत यांच्या उपस्थितीत विशेष आढावा बैठक संपन्न झाली. इगतपुरी, त्र्यंबकेश्वरचे गटविकास अधिकारी या बैठकीला हजर होते.
कातकरी जमातीला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशेष आराखडा तयार करावा, तालुकास्तरावर समिती तयार करणे, दोन्ही तालुक्यातील कातकरी वस्त्यांचे सर्वेक्षण करावे, आधारकार्ड, रेशनकार्ड, वीज, पाणी, रस्ता, शाळा, अंगणवाडी आदी सुविधा देणे, कातकरी कुटुंबांना पक्की घरे बांधुन देण्याबाबत आमदार हिरामण खोसकर यांनी चर्चा करून अंमलबजावणी संदर्भात सूचना दिल्या. कातकरी बांधवांचे स्थलांतर रोखवण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यासाठी दोन आठवड्याच्या आत समिती गठीत होणार असल्याचे उपायुक्तांनी यावेळी सांगितले. समितीमध्ये तलाठी, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, पोलीस पाटील, आदिवासी विकास विभागाचे निरीक्षक आदींचा समावेश असेल. आदिवासी कातकरी बांधव आणि अन्य सर्व जमातीच्या प्रश्नांवर माझे सूक्ष्म लक्ष असून त्यासाठी विधानसभेत पाठपुरावा करणार असल्याचे आमदार हिरामण खोसकर यांनी सांगितले.