इगतपुरीनामा न्यूज, दि. 14
इगतपुरी तालुक्यातील पुनर्वसित गाव दरेवाडी येथील शाळा बंद करून अन्य शाळेत समायोजन करण्याचे पत्र पालक सभेत वाचून दाखवणाऱ्या केंद्रप्रमुखांना मारहाण झाली आहे. पालकाने आक्रमक होऊन केंद्रप्रमुख माधव उगले यांचे नाक फोडले आहे. ही घटना आज सकाळी अकरा वाजेच्या सुमाराला घडली. अन्य शिक्षकांनी मध्ये पडून पालकांना आवरल्यामुळे अन्य संतप्त पालक शांत केले. दरम्यान केंद्रप्रमुख माधव उगले यांनी इगतपुरी पोलीस ठाणे गाठले. त्यांना इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. इगतपुरी पोलिसांकडे याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली असल्याचे समजते. केंद्रप्रमुखांवर झालेला हल्ला, मारहाण यामुळे इगतपुरी तालुक्यात शिक्षक भीतीच्या वातावरणात असून याबाबत प्रशासनाने उपाययोजना करावी अशी मागणी होत आहे. इगतपुरी तालुक्यातील सर्व शिक्षक संघटना आणि पदाधिकारी आणि शिक्षक एकत्र आले असून तातडीने संशयित आरोपीला जेरबंद करून कठोर कारवाई अशी मागणी केली आहे. कार्यवाही न झाल्यास आक्रमक आंदोलन करू असा इशारा सर्व संघटनांच्या समन्वय समितीने दिला आहे.
अधिक माहिती अशी की, इगतपुरी तालुक्यात दरेवाडी हे धरणामुळे विस्थापित गाव असून ह्या गावातील शाळा बंद करून अन्य शाळेत विद्यार्थी समायोजन करावे असे पत्र जिल्हा परिषदेकडून आले आहे. गेल्या महिन्यात शाळा बंद करू नये यासाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन सुद्धा केले होते. आज सकाळी अकरा वाजता आलेल्या पत्राचे वाचन प्रभारी केंद्रप्रमुख माधव उगले यांनी केले. यावेळी उपस्थित संशयित आरोपी बाळू देवराम गांगड याने त्यांच्यावर हल्ला करून मारहाण केली असा आरोप माधव उगले यांनी केला असून त्यांचे नाक फुटले आहे. त्यांच्यावर इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. इगतपुरी पोलिसांनी दखल घेऊन गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु केली आहे. दरम्यान इगतपुरी तालुक्यातील शिक्षक संघटना ह्याप्रकरणी आक्रमक झाल्या आहे. संबंधित आरोपीला अटक करून कारवाई करावी, तालुक्यातील घाबरलेल्या शिक्षकांना दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. कारवाई न झाल्यास आक्रमक आंदोलन करण्यात येईल असे सांगण्यात आले.