
भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – काही महिन्यांपासून इगतपुरी शहर आणि संपूर्ण तालुक्यात संततधार पाऊस कोसळत आहे. यामुळे इगतपुरी शहरातील रस्त्यांची तर अक्षरशः चाळण झालेली आहे. नगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभागाने लाखोंचा निधी खर्च करूनही यावर्षीही रस्त्यांवर मोठेमोठे खड्डे पडलेले आहेत. गणेशोत्सवाच्या निमित्ताने बांधकाम यंत्रणेला खड्डे बुजवण्याबाबतच्या नागरिकांच्या भावना इगतपुरी पोलिसांकडून कळवण्यात आल्या. गेल्या १५ दिवसांपासून पोलिसांनी याबद्धल पाठपुरावा केला. इगतपुरीतील तीन लकडी पूल आणि हनुमान मंदिराजवळचा उतार असलेल्या मार्गाने आज गणेश विसर्जन होणार होते. प्रचंड मोठे खड्डे असल्यामुळे ह्या विसर्जन मार्गावर विघ्न निर्माण होण्याची दाट शक्यता होती. आमच्या हद्धीत हा भाग येत नसल्याचा पवित्रा घेता नगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम खात्याने खड्डे बुजवण्यास टोलवाटोलवी केली. अखेर इगतपुरी पोलीस ठाण्याच्या लेडी सिंघम पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचा फौजफाटा खड्डे बुजवण्यासाठी भर पावसात रस्त्यावर उतरला. नागरिकांकडून बांधकाम साहित्य उपलब्ध करून घेत ह्या मार्गावरील खड्डे व्यवस्थितपणे पोलिसांनी स्वतः बुजवले. आजच सायंकाळी ७ वाजता होणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुकीपूर्वी खड्डे बुजवल्यामुळे मिरवणूक निर्विघ्न पार पडायला मोठी मदत निर्माण झाली. लेडी सिंघम पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव, पोलीस उपनिरीक्षक अमोल गायधनी, सहा. पोलीस उपनिरीक्षक शंकर तातडे, पोलीस हवालदार विनोद गोसावी, दिपक निकुंभ, अभिजित पोटींदे, करण ठाकूर, कृष्णा गोडसे, दीपक पटेकर, होमगार्ड पंडित, दोंदे, मोंडे, भडांगे यांनी केलेल्या ह्या कामाचे इगतपुरीकर नागरिकांनी कौतुक केले आहे. शांतता समितीच्या बैठकीत सर्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी खड्डे बुजविण्याचे दिलेले आश्वासन मात्र पोकळ ठरले. त्यामुळे नागरिकांनी नगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांचा निषेध करून संताप व्यक्त केला. ज्यांचे काम आहे त्यांना लाज वाटली पाहिजे. ते काम करत नसल्यामुळे पोलीस प्रशासन हे काम करत आहे अशी संतप्त प्रतिक्रिया प्रथमेश पुरोहित यांनी दिली. व्हिडिओ बातमी पहा https://youtu.be/Wj-vL0SykLo?si=33GxboXvfkUmyfph