
इगतपुरीनामा न्यूज, दि. ११ – आपल्या देशाची लोकसंस्कृती, लोकपरंपरा वारकरी संप्रदायामध्ये सामावलेली आहे. राष्ट्रीय एकात्मता सर्व जाती जमातींना एकत्र करून गावच्या विकासाचा, मानवतेचा विचार करीत आहे. मानवी प्रतिष्ठा म्हणजे काला प्रसाद, कृष्ण चरित्र सांगून काल्याची परंपरा जोपासली जाते. काला करिती संतजन, सवे त्यांच्या नारायण या उक्तीप्रमाणे काला म्हणजे प्रसाद, क्लेशापासून मुक्त करणारा, पाप ग्रह, क्रूर ग्रह, दृष्ट ग्रह, अघोर शक्तीपासून समाजाला सामर्थ्य बल मिळावे म्हणजेच काला प्रसाद
वारकरी संप्रदाय सोडून कोणत्याही पंथात काला केला जात नाही. भगवान श्रीकृष्ण चरित्र कथन करणे म्हणजे काला असे महत्वपूर्ण निरूपण संत वाङमय व भारतीय तत्वज्ञानाचे थोर अभ्यासक व संशोधक म्हणून परिचित असलेले जगतगुरु द्वाराचार्य विद्यावाचस्पती हभप डॉ. रामकृष्णदास लहवितकर यांनी केला. वंजारवाडी येथे अनेक वर्षांपासून प्रतिकूल परिस्थितीत गावाने अजूनही हरिनाम सप्ताहाची परंपरा टिकून ठेवली आहे. गावात जगद्गुरू तुकाराम महाराज मूर्तीचा जीर्णोद्धार झाला तेव्हापासून तुकाराम महाराज बीजला अखंड हरिनाम सप्ताह उत्साहाने साजरा केला जातो. दरवर्षी तुकाराम बीज निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते.
आठ दिवसांपासून टाळ मृदुंगाच्या गजरात सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात काल्याच्या कीर्तनाच्या सांगतेप्रसंगी डॉ. रामकृष्णदास लहवितकर बोलत होते. सर्व जाती धर्मातील लोक एकत्र येऊन देवाचा प्रसाद मोठ्या आदराने सेवन करतात. यामुळे आध्यात्मिक समता आणि सामाजिक विषमता दूर होते. लोक एकत्र येऊन गावच्या विकासाचा विषय घेतात. ही अतिशय चांगली बाब असून ती वारकरी संप्रदायाने जोपासली आहे. गावात सुधारणा झाली, आर्थिक समस्या मिटल्या. गावाचे तरुण तडफदार समाजहित पहाणारे सरपंच ज्ञानेश्वर शिंदे यांच्या प्रयत्नामुळे गाव विकासाकडे भरारी घेत आहे. गावाला मूलभूत सुविधा मिळाली पाहिजे, संस्कार संस्कृती मिळाली पाहिजे ही भावना ठेऊन भक्तीचा संगम घडावा. गेल्यावर्षी सुवर्ण महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला होता. यावर्षी देखील अलोट गर्दी पाहण्यास मिळाली. यासाठी सरपंच ज्ञानेश्वर शिंदे यांचे मोठे योगदान असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी विठू नामाच्या जयघोषात गावातून वारकऱ्यांनी दिंडी काढण्यात आली होती. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली. गेल्यावर्षी सुवर्ण महोत्सव साजरा केला होता.
