मतदार यादी तपशील प्रमाणिकरणासाठी आधार क्रमांकाचे माहिती संकलन 11 सप्टेंबरला : पहिल्या विशेष शिबिराचा लाभ घेण्याचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांचे आवाहन

इगतपुरीनामा न्यूज, दि. ८

26 जुलै २०२२ भारत निवडणूक आयोगाच्या शिफारशीनुसार लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1950 मध्ये सुधारणा करण्यात आलेल्या असून या सुधारणांची अंमलबजावणी 1 ऑगस्ट 2022 ते 1 एप्रिल 2023 पर्यंत करण्यात येणार आहे. त्यानुसार मतदार यादीतील तपशील प्रमाणिकरणासाठी मतदारांकडून ऐच्छिकपणे आधार क्रमांकाची माहिती संकलीत करण्याकरीता 11 सप्टेंबर 2022 रोजी पहिल्या विशेष शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे अशी माहिती इगतपुरीचे तहसीलदार तथा सहा. मतदार नोंदणी अधिकारी परमेश्वर कासुळे यांनी दिली आहे.

मतदार यादीतील विद्यमान मतदारांना आधार क्रमांक भरण्यासाठी नमुना अर्ज क्र. 6 ब तयार करण्यात आला असून ऑनलाईन पद्धतीने आधार क्रमांक भरण्यासाठी अर्ज क्र. 6 ब भारत निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे आयोजित करण्यात आलेल्या विशेष शिबीराच्या माध्यमातून मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्यामार्फतही घरोघरी भेटी देऊन माहिती संकलीत करण्यात येणार आहे. याबाबत https://nvsp.in/ किंवा या निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर माहिती उपलब्ध असेल. मतदार नोंदणी अधिकारी यांना मतदार यादीत नाव असलेल्या प्रत्येक व्यक्तीकडून विहित स्वरूपात आधार क्रमांक मिळविण्यासाठी वैधानिकरित्या प्राधिकृत करण्यात आले आहे. मतदारांसाठी आधार क्रमांक सादर करणे हे ऐच्छिक असणार आहे.

मतदार यादीतील नोंदीचे प्रमाणिकरण करणे, तसेच एकाच व्यक्तिचे एकापेक्षा जास्त मतदार संघात अथवा त्याच मतदारसंघात एकापेक्षा जास्त वेळा नावाची नोंदणी तपासण्यासाठी आणि मतदारांची ओळख प्रस्थापित करणे, तसेच भविष्यात मतदारांना अधिक चांगली निवडणूक सेवा प्रदान करण्याच्या उद्देशाने मतदारांकडून आधार क्रमांकाचे संकलन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे मतदार यादीतील कोणत्याही विद्यमान मतदाराचा आधार क्रमांक सादर करण्यास असमर्थतेच्या आधारावर मतदार नोंदणी अधिकारी यांना मतदार यादीतील कोणतीही नोंद वगळता येणार नाही.
मतदार स्वत: voter helpline app च्या माध्यमातून आधार प्रमाणीकरण करू शकतात अथवा आपल्या यादी भागातील BLO कडे 6 ब फॉर्म भरून देऊ शकतात. इगतपुरी तालुक्यातील मतदारांनी स्वतः पुढाकार घेऊन ११ सप्टेंबरच्या विशेष शिबीरामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन तहसीलदार परमेश्वर कासुळे, निवडणूक नायब तहसिलदार एम. एस. कारंडे व निवडणूक शाखा इगतपुरी यांनी केले आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!