इगतपुरीनामा न्यूज, दि. ५
इगतपुरी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील यांच्या संकल्पनेतून इगतपुरी तालुक्यातील शिक्षकांचा कृतज्ञता सन्मान सोहळा संपन्न आला. शिक्षक दिनानिमित्त इगतपुरी तालुक्यातील दुर्गम भागात गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे धडे देणाऱ्या गुरूमाऊलींना शाबासकीची थाप देण्याचा व सन्मान करण्याचा उपक्रम तालुक्याच्या इतिहासातील पहिलीच घटना आहे. इगतपुरी तालुक्यातील सर्वं शिक्षकांपर्यंत पोहचू शकत नसल्याने प्रातिनिधिक स्वरूपात तालुक्यातील राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक धामडकीवाडीच्या टीव्हीवरच्या शाळेचे प्रणेते प्रमोद परदेशी, कुमावत माणिकखांब, भिला अहिरे बलायदुरी, रविंद्र पाटील, विद्या पाटील वाकी यांच्यासह शिक्षकांचे प्रतिनिधी म्हणून 15 केंद्राचे केंद्रप्रमुख यांचा सन्मानपत्र, रोपटे व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील, प्रमुख अतिथी म्हणून इगतपुरीच्या गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड, सामाजिक वनीकरण विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी हिरालाल चौधरी शालेय पोषण आहार अधीक्षक प्रतिभा बर्डे उपस्थित होते. हिरालाल चौधरी यांनी आज ह्या पदावर फक्त शिक्षकांमुळे पोहचलो असल्याची भावना व्यक्त केली. गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड यांनी तालुक्यातील शिक्षणाचा उंचावलेला आलेख हा आपल्या शिक्षकांच्या मेहनतीचे फळ असल्याचे कौतुक केले. शिक्षक राष्ट्र आणि समाज निर्माता आहे. तालुक्यात शाळा भेटी करतांना गुणवत्ता पूर्ण शिक्षण देणारे गुरुजी दिसलें. गुणवत्ता उंचावण्यासाठी शिक्षकांना पाहिजे ते सहकार्य कुटुंब प्रमुख म्हणून कायम पुढे राहील अशी ग्वाही गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील यांनी दिली. भिला अहिरे, निवृत्ती तळपाडे, अप्पा जाधव यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. राजेंद्र नांदुरकर यांनी कर्तव्यनिष्ठ सेवेची प्रतिज्ञा घेतली. याप्रसंगी शिक्षकांसह सर्व विस्ताराधिकारी, विषय सहाय्यक, आस्थापना विभाग यांचा देखील सन्मान करण्यात आला. राजेंद्र मोरकर यांनी सूत्रसंचालन केले. सन्मानार्थी शिक्षकांनी यावेळी गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील यांचे आभार मानले.