
इगतपुरीनामा न्यूज – पारंपरिक शेतीत घाम गाळूनही बळीराजाला शेतीत अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. त्यांची आर्थिक परिस्थिती बदलणे आवश्यक आहे. यासाठी शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून उन्नती साधायला पाहिजे. याची सर्वांना सर्वांगीण माहिती होण्यासाठी साकुर फाट्यावरील अमृतराज ट्रेडर्सचे संचालक उत्तमराव सहाणे यांच्या संकल्पनेतून जळगावच्या जैन हिल्स येथे शेतकऱ्यांचा दोन दिवसीय अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला. या दौऱ्यावेळी उत्तमराव सहाणे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. याप्रसंगी सहभागी शेतकऱ्यांनी कृषी महोत्सवात अधिक माहिती जाणून घेतली. त्यामुळे इगतपुरी तालुक्यात नूतन वर्षात बळीराजा नवीन संकल्पना घेऊन शेतीत विविध प्रयोग करील अशी आशा व्यक्त करण्यात आली. दौऱ्यामध्ये जळगावला जैन हिल्स येथील ३ हजार हेक्टरवरील विविध प्रयोग शेतकऱ्यानी डोळे भरून पाहत विविध अवजारांची माहिती घेतली. मातीशी घट्ट नाळ जुळलेले उत्तमराव सहाणे स्वतः प्रगतशील शेतकरी असून शेतकऱ्यांच्या व्यथांची त्यांना चांगली जाण आहे. आपल्याबरोबरच इतर शेतकऱ्यांचा फायदा व्हावा यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात. पहिल्यांदाच श्री. सहाणे यांच्या माध्यमातून अभ्यास दौऱ्यात तालुक्यातील शेतकऱ्यांना सहभाग घेता आला. उत्तमराव सहाणे यांनी स्वखर्चातुन अभ्यास दौरा आयोजित केल्याने प्रभाकर सहाणे, किसन साळवे, गोपीनाथ गायकवाड, रोहिदास गायकर, जगन साळवे, सोपान सहाणे, नंदू बहिऊ सहाणे, नंदू शिवराम सहाणे, हरिश्चंद्र सहाणे, नानासाहेब कुंदे, गणेश सहाणे, राजू सहाणे, कैलास सहाणे, योगेश पागेरे, सुरेश जाधव, रोहिदास पागेरे, अभिषेक कोठुळे, समाधान कोठुळे, लक्ष्मण सोनवणे आदी शेतकऱ्यांनी आभार मानले.
