इगतपुरीनामा न्यूज, दि. ५
शिक्षकांच्या हातात देशाचे भविष्य आहे कारण शिक्षकांमुळे भावी डॉक्टर, वकील, शास्त्रज्ञ, इंजिनियर, लेखक, शिक्षक आणि अनेक क्षेत्रांमध्ये प्रगती करून देशाचे नाव उंचावणारी सामर्थ्यवान पिढी तयार होते. आपले विचार, मत आणि व्यक्तिमत्त्व घडवण्यामागे शिक्षकांचा मोठा वाटा असतो. चांगले संस्कार, शिस्तीत राहणे आणि योग्य शिक्षण देऊन जगासमोर उभे राहण्याची ताकद शिक्षकांमुळे येते. या नात्याचं महत्त्व समजवण्यासाठी आणि शिक्षकांप्रती प्रेम व्यक्त करण्यासाठी हा दिन साजरा केला जातो असे प्रतिपादन इगतपुरीचे प्रसिद्ध विधितज्ज्ञ ॲड. सुनिल कोरडे यांनी केले.
शिक्षक’ हा भावी पिढीचा शिल्पकार असून त्यांच्याकडूनच आपल्याला ज्ञान व जगाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी मिळत असते. आपल्या गुरू, शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. या शिक्षक दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ॲड. सुनील कोरडे यांनी शिक्षकांची कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाच्या प्रसंगी नाभिक समाजाचे जिल्हाध्यक्ष पत्रकार एकनाथ शिंदे, ॲड. सुनिल कोरडे, पत्रकार लक्ष्मण सोनवणे, मुख्याध्यापक किशोर पाटील, शिक्षक संघाचे माजी अध्यक्ष जनार्दन कडवे, ज्ञानेश्वर घोडे, दशरथ सोनवणे, माणिक भालेराव, अनिता बुवा, पूनम दुभाषे, सामाजिक कार्यकर्ते संपत बोराडे आदी उपस्थित होते.