ज्ञानेश्वर महाले : इगतपुरीनामा न्यूज, दि. २३
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळात १५० कोटी रुपये खर्चून पिंपळगाव बहुला ते त्र्यंबकेश्वर हा राज्य महामार्ग तयार करण्यात आला. देशातील पहिला ग्रीन हायवे म्हणून त्याची ख्याती असली तरी या महामार्गावर मोठमोठे खड्डे पडल्याने अपघातांना निमंत्रण मिळत आहे. रस्त्यावर टप्प्या टप्प्याने खड्डे पडलेले असल्याने खड्ड्यांमुळे अपघातात वाढ झाली आहे. रस्त्याची दुरवस्था असल्याने रस्त्याच्या निकृष्ट कामाचा दर्जा उघड झाला आहे. त्यामुळे ठेकेदाराच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. ह्यामुळे भाविकांसह नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
लाखो रुपये खर्च करून त्र्यंबक नाशिक रस्ता तयार करण्यात आला. मात्र निकृष्ट दर्जाच्या कामामुळे संपूर्ण रस्ता उखडलेला आहे. त्यामुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याची डागडुजी थातुर मातुर केली जाते. याकडे संबंधित अधिकारी यांनी लक्ष देणे आवश्यक आहे. अन्यथा आंदोलन करण्याचा मार्ग धरावा लागेल.
- कैलास मोरे, तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस
नाशिक त्र्यंबक रस्त्याचे काम तीन ठेकेदारांमार्फत करण्यात आले. मात्र ठेकेदारांच्या निष्काळजीपणामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेक ठिकाणी रस्ता खचलेला असून पडलेले खड्डे सतत बुजविण्याचा सार्वजनिक बांधकाम विभागाचा प्रयत्न हास्यास्पद ठरत आहे. गतवर्षी परिसरातील नागरिकांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणतेही कारवाई होत नसल्याने नागरिक नाराजी व्यक्त करत आहे. पावसाळा आला की थातूर मातुर डागडूजी करून वरचेवर खड्डे बुजविले जातात. तरीही खड्डे उघडे पडत असून त्यामुळे दुचाकी स्लीप होण्याचा धोका वाढला आहे. हा महामार्ग दोन वर्षात जणू मृत्यूचा सापळा बनला आहे. त्र्यंबकेश्वर व सातपूर पोलीस ठाण्याच्या नोंदीवरून दोन वर्षात जवळपास १३८ अपघात ४६ लोक मृत्यूमुखी पडले आहेत. रस्त्याच्या साईट पट्ट्यावर मुरूम टाकण्याच्या नावाखाली दरवर्षी लाखो रुपये अधिकाऱ्यांच्या मर्जीतील ठेकेदार काढत असतो. परंतु गेल्या दोन वर्षात एकदाही साईट पट्ट्यावर मुरूम टाकला नसल्याचे परिसरातील नागरिक सांगत असल्याने दोषी अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी वाढू लागली आहे.