दरेवाडी येथील बिबट्याच्या हल्ल्यातील मृत बालकाच्या कुटुंबाला दिला आधार
इगतपुरीनामा न्यूज, दि. २०
इगतपुरी तालुक्यात बिबट्याचा हैदोस वाढत असून यामुळे निरपराध नागरिक आणि बालकांचे हकनाक बळी जात आहेत. झालेली हानी कशानेही भरून निघणारी नाही. यामुळे अशा अप्रिय घटना टाळण्यासाठी वन विभागाने डोळ्यांत तेल घालून प्रभावी नियोजन करावे. दरेवाडी येथील बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या बालकांच्या कुटुंबाला तातडीने भरपाई द्यावी. बळी जाण्याच्या घटना टाळण्यासाठी वन अधिकाऱ्यांना कार्यक्षेत्रात चोख व्यवस्थापन करायला भाग पाडावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तुकाराम वारघडे यांनी केली आहे. बिबट्याच्या दहशतीखाली असलेल्या जनतेला तातडीने दिलासा न दिल्यास वन खात्याला आक्रमक जनतेच्या आक्रोशाला सामोरे जावे लागेल असा इशारा त्यांनी दिला.
दरेवाडी येथील विठ्ठल आनंदा गावंडा यांचा १० वर्षीय एकुलता एक मुलगा बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाला. ह्या कुटुंबाकडे संवेदना व्यक्त करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते तुकाराम वारघडे यांनी भेट दिली. संपूर्ण इगतपुरी तालुक्यातील नागरिक तुमच्या कुटुंबाच्या पाठीशी असून दुःखातून सावरण्यासाठी शक्य ते सर्व सहकार्य करू असे त्यांनी मयत मुलाचे वडील विठ्ठल गावंडा, आई फुलाबाई विठ्ठल गावंडा आणि परिवाराला सांगितले. लवकरच वन विभागाच्या तालुका आणि जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांची भेट घेऊन याप्रकरणी न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असे ते म्हणाले. यावेळी दिनकर ईदे, एकनाथ घारे, संतु घारे, गोविंद घारे, अजय पारधी आदी उपस्थित होते.