इगतपुरीनामा न्यूज, दि. 24
कसारा घाटाला सह्याद्रीचा ढाण्या वाघ आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे आणि भावली धरणाला आदिवासी क्रांतिकारक राया ठाकर यांचे नाव द्यावे अशी मागणी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश युवाध्यक्ष लकीभाऊ जाधव यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे केली आहे. विविध मागण्यांची दखल घेऊन आदिवासींना न्याय मिळावा यासाठी त्यांनी निवेदन देऊन सकारात्मक चर्चा केली. यावेळी राष्ट्रीय युवाध्यक्ष जितेंद्र मोघे, रामसाहेब चव्हाण, गणेश गवळी, सोमनाथ खोटरे व इतर राज्यातील परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते. देशाचा मूळ मालक असणाऱ्या आदिवासी समाजाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार सोमजीभाई डामोर, राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा केंद्रीय पोलाद व ग्रामविकास राज्यमंत्री फग्गनसिंह कुलसते, राष्ट्रीय कार्याध्यक्ष माजी मंत्री मधुकरराव पिचड, राष्ट्रीय उपाध्यक्ष शंकरराव बोडात यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रपतींची भेट घेतली.
कसारा घाटाला सह्याद्रीचा ढाण्या वाघ आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे आणि भावली धरणाला आदिवासी क्रांतिकारक राया ठाकर यांचे नाव द्यावे,महाराष्ट्रात 5 वी अनुसूचीची अंमलबजावणी करावी, मरांग गोमके, जयपालसिंह मुंडा यांचा इतिहास देशातील विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात घ्यावा, त्यांना भारतरत्न द्यावा, आदिवासींची स्वतंत्र जनगणना करून आदिवासी धर्मकोड 7 लागू करावा, प्रत्येक राज्यात आदिवासींचे स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करावे, अनुसूचित क्षेत्रातील जमिनींचे बेकायदेशीर हस्तांतर थांबवून पीडित आदिवासींना न्याय मिळावा, आदिवासींच्या बळकावलेल्या जागा रिक्त करून खऱ्या आदिवासींची पदभरती करण्यासाठी महाराष्ट्र शासनाला निकालाची अंमलबजावणी करण्याचे आदेश द्यावेत, महाराष्ट्रातील आदिवासींची 2017 ची रखडलेली विशेष पदभरतीची अंमलबजावणी करावी यावी, कसत असलेल्या गायरान व वनजमिनी आदिवासींच्या नावावर कराव्या, संपूर्ण आदिवासी गावे असूनही ती गावे सर्वेक्षणात पेसा कायद्यापासून वंचित आहेत. त्या गावांचा पुन्हा सर्वेक्षण करून पेसा कायद्यात समावेश करावा, दिल्ली येथे आदिवासी विद्यार्थ्यासाठी युपीएससीच्या तयारीसाठी प्रशिक्षण, वसतीगृहाची निर्मिती करावी, जागतिक आदिवासी दिनाला संपूर्ण देशात शासकीय सुट्टी जाहीर करावी, सैन्यात आदिवासी बटालियन तुकडी स्थापन करावी, आदिवासी कलावंतांना मासिक मानधन द्यावे, आदिवासींचे मोठ्या प्रमाणात होणारे धर्मांतर रोखण्यासाठी सक्षम कायदे करून धर्मांतर करणाऱ्यांच्या सवलती रद्द कराव्या, अनुसूचित क्षेत्रातील गौण खनिजांचा कर हा स्थानिक ग्रामपंचायतींना मिळावा, आदिवासी कोट्यातील रिक्त जागांची पदभरती करावी, पैसा पदभरती करावी आदी मागण्या निवेदनात करण्यात आलेल्या आहेत.