इगतपुरीनामा न्यूज, दि. ९
समृद्धी महामार्गासाठी इगतपुरी तालुक्यातील काम प्रगतीपथावर आहे. ह्या कामासाठी शासनाने अनेक शेतकऱ्यांची जमीन संपादन केली आहे. असे असूनही स्थानिक शेतकऱ्यांना ह्याचा फायदा होणार नाही. मात्र यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ता शिल्लक राहिला नाही. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या तीव्र भावना आहेत. म्हणून समृद्धी महामार्गाच्या दोन्ही बाजूने 10 फुटाचा सर्व्हिस रोड निर्माण केल्यास शेतकऱ्यांना फायदा होईल अशी मागणी इगतपुरी तालुक्यातील शिष्टमंडळाने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून केली. मुख्यमंत्री महोदयांनी तातडीने कार्यवाही करीत संबंधित अधिकाऱ्यांना यासंदर्भात शेतकऱ्यांच्या मागणीनुसार कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. शिष्टमंडळाचे नेतृत्व कांचनगावचे माजी सरपंच तथा इगतपुरी तालुका मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष रामदास गव्हाणे यांनी केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी रामदास गव्हाणे यांना सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही दिली. रामदास गव्हाणे यांनी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून माहिती दिली. एमएसआरडीसी मुख्य कार्यकारी अधिकारी राधेश्याम मोपलवर यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संपर्क साधून सर्व्हिस रोडबाबत पूर्तता करण्यासाठी सूचना दिल्या. रामदास गव्हाणे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात डॉ. महेंद्र शिरसाठ, डॉ. मनोज नेटावटे, उध्दव मोराडे, गणपत शिरसाठ, प्रतीक गोवर्धने यांचा समावेश होता. तातडीने दखल घेऊन शेतकऱ्यांची मागणी पूर्ण होणार असल्याने रामदास गव्हाणे यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.