
इगतपुरीनामा न्यूज, दि. ९
जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गोरख बोडके यांच्या कोरोनाकाळातील कामगिरीबाबत सातत्याने अनेकांकडून माहिती दिली जात होती. याबाबत त्यांची भेट झाल्यावर त्यांचे विशेष कौतुक केले होते. अशा सुप्रसिद्ध व्यक्तिमत्वाला पुरस्काराने सन्मानित करतांना अत्यानंद होत आहे. आदिवासी समाज बांधव आणि समाजाच्या सर्व घटकांसाठी कोविड काळात 24 उपलब्ध असणारे गोरख बोडके सन्मानाला पात्र आहेत असे कौतुक माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढले. अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेने जागतिक आदिवासी गौरव दिनानिमित्त नाशिकच्या गोल्फ क्लब मैदानावर आयोजित केलेल्या भव्य कार्यक्रमात ते बोलत होते. कोविड काळात आदिवासी समाजाची सर्वोत्तम सेवा केल्याबद्दल अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेतर्फे आदिवासी समाजसेवक कोविड योद्धा पुरस्काराने जिल्हा नियोजन समिती सदस्य गोरख बोडके यांना सन्मानित करण्यात आले. प्रदेश युवाध्यक्ष लकीभाऊ जाधव यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी राज्याच्या कानकोपऱ्यातील आदिवासी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
