लेखन : लक्ष्मण सोनवणे, पत्रकार
अनेकजण नेहमी स्वार्थापोटी काम करीत असले तरी यात समाजसेवेचा हेतू निमित्त मात्र असतो. ह्या धावपळीच्या युगात कुणाला कुणाची मदत करण्यासाठी वेळच नसल्याचे सर्वत्र पहावयास मिळत असले तरी शेणवड खुर्द येथील तुकाराम वारघडे या अवलीयाने आपल्या वेगवेगळ्या निस्वार्थी सामाजिक कार्याने जिल्हाभरात सामाजिक कामाचा ठसा उमटवला आहे. गरीब आदिवासी कुटुंबात जन्म झालेल्या तुकाराम वारघडे यांना गोरगरिबांच्या व्यथांची चांगलीच जाण असून आपल्या खिशाला झळ देऊन आरोग्यदूत म्हणून ते तत्पर सेवा देत आहेत. इगतपुरी तालुक्याचा हा “तुकाराम” अनेकांच्या गळ्यातील ताईत बनला आहे.
मृत्यूचा सापळा असणाऱ्या महामार्गांवर कोणताही अपघात घडल्यास तातडीने हजर राहून मदत करतात. जिल्हा रुग्णालयापर्यंत जाऊन रुग्णांची विचारपूस आणि दिलासा दिला जातो. रुग्णांची काळजी घेण्यासाठी त्यांचा नेहमीच पुढाकार असतो. आदिवासी दुर्गम भागातील लोकांना आरोग्य सुविधा तात्काळ मोफत मिळवून देण्यास ते कधीच कमी पडत नाही. ही सेवा बजावत असताना विविध प्रकारच्या उपचारासाठी मदत स्वतःच्या खिशातून करतात. महामार्गावर अपघात घडल्यास ते तातडीने मदत करायला मागे हटत नाही. एखाद्या कुटुंबातील व्यक्तीचा नैसर्गिक, अपघाती मृत्यू झाल्यास त्या गरीब कुटुंबाची भेट घेत त्यांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी त्यांचे योगदान आहे. इगतपुरी तालुका आदिवासी तालुका असून यात समाजाचे अनेक अशिक्षित आहेत. त्यांना शासनाच्या विविध योजना कशा मिळतील यावर देखील त्यांचा भर असतो. आदिवासी समाजात जनजागृती, व्यसनमुक्ती, त्यांच्या व्यथा, संघटन यावरही त्यांचा भर आहे.
वंचित, गोरगरीब व्यक्तींसाठी झटणाऱ्या तुकाराम वारघडे यांच्या कार्याचे सर्वच स्तरातून कौतुक होत असते. आदिवासी समाजातील मुलांनी शिक्षण घ्यावे यासाठी मुलांना शालेय साहित्य, शाळेला काही वस्तूंची कमतरता असेल तर त्यांचा मदतीचा ओघ सुरूच असतो. आर्थिक दुर्बल घटकातील लहान बालकांच्या विविध प्रकारच्या शस्रक्रिया, जेष्ठ नागरिकांची डोळ्यांची शस्रक्रिया, इतर आरोगसुविधा त्यांनी मोफत मिळवून दिल्या आहेत. निराधार, वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी नसानसात सामाजिक कामाचे बळ असणाऱ्या या अवलियाच्या कार्याचा अनेक संस्थांनी गौरव देखील केला आहे. गोरगरिबांची सेवा हीच ईश्वरसेवा आहे. सामाजिक कामातून केलेली मदत आयुष्य बदलू शकते. निस्वार्थीपणाने केलेल्या मदतीमुळे मिळणारा गोरगरिबांचा दुवा हाच मोठा आशीर्वाद आहे असे उदगार तुकाराम वारघडे कायमच काढत असतात. अशा मौलिक व्यक्तिमत्वाला वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा..!