इगतपुरीनामा न्यूज, दि. ३
तंबाखूमुक्त शाळा अभियानांतर्गत इगतपुरी तालुकास्तरीय कार्यशाळा घोटी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली. शिक्षण विस्ताराधिकारी राजेश तायडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात शिक्षण विस्ताराधिकारी अशोक मुंढे, श्रीराम आहेर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या कार्यशाळेत तालुक्याच्या २४८ शाळेतील मुख्याध्यापक सहभागी झाले होते. उपस्थित सर्व शाळांना ‘तंबाखूमुक्त शाळा’ करण्यासाठी शासनाने पारित केलेल्या नऊ निकषाबाबत प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षण हे दोन सत्रात पार पडले. सर्व निकष कसे पूर्ण करावेत याबाबत तज्ज्ञनी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी सलाम मुंबई एव्हरेस्ट फाउंडेशनचे अजय चव्हाण यांनी तंबाखूमुक्त शाळा अभियानाबाबत आणि नऊ निकष कसे पूर्ण करावेत या विषयी सविस्तर माहिती दिली. तालुक्याचे तज्ञ मार्गदर्शक संजय येशी यांनीही तंबाखूमुक्त शाळेचे निकष बाबत मार्गदर्शन करून नऊ निकषाबाबत माहिती दिली. यावेळी शिक्षण विस्ताराधिकारी राजेश तायडे यांनी सर्वच शाळांनी सर्व निकष लवकरात लवकर पूर्ण करावेत असे सांगून मार्गदर्शन केले. तालुक्यात यापूर्वी 19 शाळा तंबाखूमुक्त झाल्या आहेत. प्रशिक्षणानंतर एका आठवड्यात तालुक्यातील १०० शाळा या तंबाखूमुक्त झाल्या आहेत. उर्वरित सर्वच शाळा ह्या तंबाखूमुक्त होण्याच्या मार्गावर आहेत आहेत. भावी पिढी तंबाखू सारख्या व्यसनापासून दूर ठेवण्यास अभियानाचा फायदा शाळेला होणार असल्याने सर्व मुख्याध्यापकांनी आपल्या शाळा लवकरच तंबाखूमुक्त करण्याचा निर्धार घेतला आहे. स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्टपर्यंत संपूर्ण तालुका तंबाखूमुक्त शाळांचा तालुका घोषित करणार असल्याचे गटशिक्षणाधिकारी यांनी संगितले.